बातम्या
राधानगरीत पाच दिवसीय सर्वरोग निदान शिबिराचा उत्साहपूर्ण शुभारंभ
By nisha patil - 10/13/2025 5:56:42 PM
Share This News:
नागरिकांनी आरोग्य शिबिरातील मोफत सुविधांचा लाभ घ्यावा – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
राधानगरीत पाच दिवसीय सर्वरोग निदान शिबिराचा उत्साहपूर्ण शुभारंभ
कोल्हापूर, दि. १३ : राधानगरी ग्रामीण रुग्णालयात सुरू झालेल्या पाच दिवसीय मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे भव्य उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. ‘आरोग्य आपल्या दारी’ या संकल्पनेतून आयोजित या शिबिरात ग्रामीण भागातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
मंत्री आबिटकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना आभा कार्ड, मोफत चष्मे आणि श्रवणयंत्रे वाटप करत सर्वांनी नियमित आरोग्य तपासणी करून शिबिरातील मोफत सुविधा घ्याव्यात, असे आवाहन केले. तसेच ‘आरोग्यपूर्ण दिवाळी’ या उपक्रमांतर्गत तपासणीत निदान झालेल्या रुग्णांना पुढील उपचारही मोफत देण्यात येतील, अशी घोषणा केली.
१३ ते १७ ऑक्टोबरदरम्यान चालणाऱ्या या शिबिरात रक्त तपासणी, ईसीजी, एक्स-रे, सोनोग्राफी, २डी ईको, कर्करोग, क्षयरोग, स्त्रीरोग आणि बालरोग तपासणीसह आयुष्यमान कार्ड वाटप, अवयवदान जनजागृती आणि ‘निश्चय मित्र आहार किट’ वितरणाचे आयोजन आहे.
उद्घाटनावेळी डॉ. दिलीप माने, डॉ. प्रशांत वाडीकर, डॉ. अनिरुद्ध पिंपळे, डॉ. हर्षदा वेदक, डॉ. हेमलता पालेकर यांसह अनेक वैद्यकीय अधिकारी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते. शिबिराद्वारे नागरिकांनी निरोगी आणि सुरक्षित जीवनाकडे वाटचाल करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.
राधानगरीत पाच दिवसीय सर्वरोग निदान शिबिराचा उत्साहपूर्ण शुभारंभ
|