बातम्या
कोल्हापुरात पुरस्थिती तीव्र; आतापर्यंत 295 नागरिक व 129 जनावरांचे स्थलांतर
By nisha patil - 8/21/2025 4:06:32 PM
Share This News:
कोल्हापुरात पुरस्थिती तीव्र; आतापर्यंत 295 नागरिक व 129 जनावरांचे स्थलांतर
बातमी : जिल्ह्यात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरू असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी नद्यांची पातळी वाढतच असल्याने नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरण्याची भीती कायम आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर सुरू ठेवले आहे. आतापर्यंत कोल्हापुरातील 35 जणांसह जिल्ह्यातील 79 कुटुंबातील 97 पुरुष, 94 महिला, 32 लहान मुले मिळून एकूण 295 लोकांसह 129 जनावरांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नदीकाठावरील परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्याचे काम सुरू असून, रविवारी 19 कुटुंबातील 40 लोकांचे स्थलांतर करण्यात आले होते. मंगळवारपर्यंत ही संख्या 176 वर गेली. बुधवारी राधानगरी तालुक्यातील आवळी बु. येथील 10 कुटुंबातील 47 लोक आणि 59 जनावरांचे, तसेच सुंळबी, पिरळ, फेजिवडे, गुडाळ, गुडाळवाडी, तुरंबे, सिरसे, कौलव आणि हळदी परिसरातील नागरिक व जनावरांचे स्थलांतर करण्यात आले.
हळदी गावात भोगावती नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेक घरात पाणी शिरले असून, त्यामुळे 74 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. तसेच भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथील 3 कुटुंबातील 12 लोक व 3 जनावरांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
👉 प्रशासन नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदीकाठावरील परिसर टाळण्याचे आवाहन करत आहे.
कोल्हापुरात पुरस्थिती तीव्र; आतापर्यंत 295 नागरिक व 129 जनावरांचे स्थलांतर
|