ताज्या बातम्या

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत ‘AI’चा वापर; आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख करण्यावर भर

Focus on making the health system more people oriented


By nisha patil - 12/17/2025 11:40:59 AM
Share This News:



मुंबई:- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार असून, यामुळे आरोग्य सेवा अधिक सुलभ, जलद आणि लोकाभिमुख होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक आरोग्य सेवेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या असून, ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी यासंदर्भात मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर आवश्यक असून, डिजिटल आणि AI आधारित प्रणालीमुळे सेवांचा दर्जा उंचावेल. या बैठकीत ‘समग्र’ संस्थेच्या वतीने आरोग्य सेवा बळकटीकरण अंतर्गत आरोग्य संस्थांचे स्टार रेटिंग, आरोग्य समीक्षा, हेल्पलाइन, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि सेवांचा आढावा याबाबत सादरीकरण करण्यात आले.

दरम्यान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ‘आपले गाव, आरोग्य संपन्न गाव’ योजना, पॉलिएटिव्ह केअर, सिकलसेल कार्यक्रम, वैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रिया सुलभ करणे, मानधन वाढ, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समावेशन जलद करणे, तसेच आयुष संचालक, प्रशिक्षण संचालक व नर्सिंगसाठी नवीन पदनिर्मिती यासंदर्भात मागण्या मांडल्या. या मागण्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.

या बैठकीस मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रविंद्रन, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, समग्र संस्थेचे प्रतिनिधी गौरव गोयल तसेच सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत ‘AI’चा वापर; आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख करण्यावर भर
Total Views: 87