बातम्या

कोल्हापुरातील माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांचे  निधन

Former Kolhapur corporator Nandkumar More passes away


By Administrator - 2/26/2026 1:05:53 PM
Share This News:



कोल्हापुरातील माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांचे  निधन

कोल्हापूर महानगरपालिकेतील माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक नंदकुमार मोरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते माजी महापौर सरिता मोरे यांचे पती होत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
 

गेल्या दोन दिवसांपासून आजारी असलेल्या मोरे यांना कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले.
 

मोरे यांचे बंधू सुभाष मोरे हेही नगरसेवक होते. सन २००० मध्ये खोल खंडोबा परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या नंदकुमार मोरे यांना पहिल्याच वर्षी ताराराणी आघाडीचे नेते महादेवराव महाडिक यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाची संधी दिली होती.
 

सभापतीपदाच्या कार्यकाळात त्यांनी केएमटीला भरीव निधी उपलब्ध करून देत परिवहन सेवा रुळावर आणण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच महानगरपालिकेतील विद्युत विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रकरणी एका उपअभियंत्याला निलंबित करून विभागीय चौकशीही लावण्यात आली होती.
 

यानंतर त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी उमेदवारी दिली होती; मात्र थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता.
 

नंदकुमार मोरे यांच्या निधनाने कोल्हापूरच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून, विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.


कोल्हापुरातील माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांचे  निधन
Total Views: 84