ताज्या बातम्या
किल्ले धर्मवीरगडचे राजेशिर्के घराण्याचे वंशज माजी सरपंच देविदास काका राजेशिर्के अनंतात विलीन
By nisha patil - 9/27/2025 3:02:08 PM
Share This News:
किल्ले धर्मवीरगडचे राजेशिर्के घराण्याचे वंशज माजी सरपंच देविदास काका राजेशिर्के अनंतात विलीन
समाजसेवी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड ;
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अ.नगर जिल्ह्यातील मौजे पेडगांव ता. श्रीगोंदा, ऐतिहासिक किल्ले धर्मवीरगड (बहादुरगड) येथील महाराणी येसुबाई साहेब तथा राजेशिर्के घराण्याचे वंशज, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहिल्यानगर "जिल्हा उपाध्यक्ष" व पेडगाव किल्ले धर्मवीरगडचे माजी सरपंच पैलवान मा.श्री. देविदास (काका) गणपतराव राजे शिर्के (वय- ४४ वर्षे ) यांचे सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी वाडिया हॉस्पिटल पुणे येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले असून असंख्य लहान थोरांच्या मना-मनात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा निर्माण झालेले नेतृत्व तसेच समाजसेवी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने व राजेशिर्के घराण्याला जे दुःख झाले, त्यामुळे संपूर्ण गावासह तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे
सरपंच देविदास काका राजेशिर्के यांनी अगदी कमी वयात आपले वडील स्वर्गवासी चेअरमन पैलवान गणपतराव राजेशिर्के यांच्या पावलावर पाऊल टाकत सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रवेश करून समाजसेवा करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी श्रीगोंदा मार्केट कमेटी, ग्रामपंचायत, शेतकरी सोसायटी आदि अनेक निवडणुका लढविल्या होत्या तर गावातील किल्ले धर्मवीरगड संवर्धन कार्यासह मंदिरे बांधण्या बरोबरच धार्मिक ,सामाजिक कार्यासाठी देणगी देण्यासाठी ते कायम पुढे असत तसेच गोर गरीबांसह गरजवंताला आर्थिक मदत देणे, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात ही ते नेहमी अग्रस्थानी असत, पैलवान असल्याने त्यांनी कुस्ती क्षेत्रात नावलौकीक मिळवला होता. क्रिकेटमध्ये ही ते अष्टपैलू खेळाड होते. अशा विविध सामाजिक राजकीय क्षेत्रात भरीव कार्य केल्याने ते विरोधकांच्या ही मनावर राज्य करणारे व्यक्तिमत्व ठरले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश नेते तथा राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के, इतिहास अभ्यासक व पत्रकार लक्ष्मीकांत राजे शिर्के, सतिश राजेशिर्के यांचे ते धाकले बंधु होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी, मुलगा यशराज राजेशिर्के, भावजया, चुलते, पुतणे, चुलत बंधु, चुलत भावजया आदि मोठा राजेशिर्के परिवार आहे. राजेशिर्के परिवाराच्या दुःखात सामाजिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी सांत्वरपर भेट देऊन धीर देत सांत्वन केले आहे. दशक्रिया विधी १ ऑक्टोबर २०२५ रोजी वार बुधवार सकाळी ८ : ०० वाजता श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे भीमा नदी तीरावर होईल. दशक्रिया विधी निमित्त ह.भ.प. विजयाताई पंडित यांचे प्रवचन होईल.
किल्ले धर्मवीरगडचे राजेशिर्के घराण्याचे वंशज माजी सरपंच देविदास काका राजेशिर्के अनंतात विलीन
|