ताज्या बातम्या
अन्नाच्या शोधात शहरात आलेल्या कोल्ह्याचा दमछाकीने मृत्यू
By nisha patil - 12/27/2025 12:15:40 PM
Share This News:
जंगल परिसरातून अन्नाच्या शोधात ऊस क्षेत्रात आलेला कोल्हा वाट चुकून शहरात दाखल झाला. हा कोल्हा कसबा बावडा परिसरातून पितळी गणपती मार्गे शुक्रवारी कदमवाडी परिसरात पोहोचला होता. सकाळपासून शहरातील विविध भागांत हा कोल्हा नागरिकांना दिसून येत होता.
दरम्यान, अनेक ठिकाणी नागरिकांकडून कोल्ह्याला दगड मारून पळवून लावण्याचे प्रकार घडले. याबाबतची माहिती वन विभाग आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच सायंकाळी दोन्ही विभागांचे अधिकारी व कर्मचारी कदमवाडी परिसरात दाखल झाले.
महापालिका अग्निशमन विभागाचे चिफ फायर ऑफिसर मनीष रणभिसे, कसबा बावडा अग्निशमन केंद्राचे स्टेशन ऑफिसर विजय सुतार, फायरमन सुनील यादव, आशिष माळी, चालक सुशांत पवार तसेच वन विभागाच्या वन्यजीव पथकातील वनरक्षक ओंकार भोसले, ऋषीकेश येडगे, ओमकार काटकर, आशुतोष सूर्यवंशी आणि तौसिफ शेख यांनी संयुक्त कारवाई करत सापळा रचून कोल्ह्याला पकडले.
पकडण्यात आलेल्या कोल्ह्याला अग्निशमन विभागाने वन विभागाकडे सुपूर्द केले. मात्र, त्याला सुरक्षित ठिकाणी नेत असताना प्रचंड दमलेल्या अवस्थेत वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
कोल्ह्याच्या मृत्यूची वैद्यकीय तपासणी वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होती. प्राथमिक तपासणीत कोल्हा उपाशी असल्याने आणि सततच्या धावपळीमुळे अत्यंत अशक्त झाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती वन विभागाचे अधिकारी नंदकुमार नलवडे यांनी दिली.
अन्नाच्या शोधात शहरात आलेल्या कोल्ह्याचा दमछाकीने मृत्यू
|