ताज्या बातम्या
शहरी भागात लोमडीचा धुमाकूळ; गोठ्यात रक्तरंजित हल्ला, नागरिकांमध्ये भीती
By nisha patil - 12/24/2025 12:10:31 PM
Share This News:
कोल्हापूर:- कसबा बावडा येथील शहरी वस्तीत मंगळवारी दुपारी अचानक लोमडी शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुमारे साडेतीनच्या सुमारास रस्त्यांवर फिरणाऱ्या लोमडीने एका गोठ्यात बांधलेल्या रेडकावर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हल्ल्यानंतर लोमडी परिसरातील गल्ल्यांमधून सैरावैरा धावत राहिल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक बावडा रेस्क्यू फोर्सच्या कार्यकर्त्यांनी लोमडीला पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र ती पळून जाण्यात यशस्वी ठरली.
दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. परिसरात ऊस शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने वन्य प्राणी शहरी भागात येण्याचे प्रमाण वाढत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शहरी भागात लोमडीचा धुमाकूळ; गोठ्यात रक्तरंजित हल्ला, नागरिकांमध्ये भीती
|