बातम्या
नोकरीचे आमिष दाखवून ९.४८ लाखांची फसवणूक; सातार्डेतील उदय शिंदेविरोधात गुन्हा
By nisha patil - 7/30/2025 3:21:12 PM
Share This News:
नोकरीचे आमिष दाखवून ९.४८ लाखांची फसवणूक; सातार्डेतील उदय शिंदेविरोधात गुन्हा
पन्हाळा प्रतिनिधी शहाबाज मुजावर ; सरकारी नोकरी लावून देतो, असे सांगत सातार्डे (ता. पन्हाळा) येथील उदय वसंत शिंदे याने एका व्यक्तीकडून तब्बल ९ लाख ४८ हजार रुपये उकळले. या प्रकरणी भादोले (ता. हातकणंगले) येथील तेजस चिमाजी पठाणे (वय ४३) यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेजस पठाणे हे कायद्याचे पदवीधर असून वकिली करतात. ओळखीतून शिंदे यांची त्यांच्याशी मैत्री झाली. शिंदे याने "माझे वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी संबंध आहेत, तुला सरकारी नोकरी लावून देतो" असे सांगून पठाणे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने नोकरी लावण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली. त्यावर विश्वास ठेवून पठाणे यांनी रोख व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने टप्प्याटप्प्याने ९.४८ लाख रुपये शिंदेला दिले.
मात्र, पैसे घेतल्यानंतर शिंदे याने वेळकाढूपणा करत नोकरी लावली नाही. जेव्हा पैसे मागितले गेले, तेव्हा त्याने "तू पुन्हा माझ्या दारात आलास तर पाय मोडून टाकीन" अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले तपास करत आहेत.
नोकरीचे आमिष दाखवून ९.४८ लाखांची फसवणूक; सातार्डेतील उदय शिंदेविरोधात गुन्हा
|