बातम्या
भाडेकराराच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक चार महागड्या गाड्या बळकावल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल
By nisha patil - 12/27/2025 11:49:54 AM
Share This News:
कोल्हापूर :
भाडेकराराच्या नावाखाली चार महागड्या गाड्या ताब्यात घेऊन भाडे न देता तसेच वाहन परत न करता तब्बल १ कोटी १२ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी आदित्य बजरंग तळेकर (वय २७, व्यवसाय – धंदा, रा. कोल्हापूर) यांनी तक्रार दिली असून, आदित्य विजयकुमार पाटील (वय २२, रा. कोल्हापूर) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२४ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने दरमहा भाडे देण्याच्या अटीवर फिर्यादीकडून चार गाड्या भाड्याने घेतल्या होत्या. यामध्ये
• ब्रेझा (MH 14 GS 2334) – अंदाजे किंमत ₹१० लाख
• बलेनो (MH 09 BM 6970) – अंदाजे किंमत ₹५ लाख
• स्वीफ्ट डिझायर (MH 03 AZ 2337) – अंदाजे किंमत ₹७ लाख
• स्वीफ्ट टूर (MH 45 AL 4230) – अंदाजे किंमत ₹३.४० लाख
या वाहनांचा समावेश आहे.
आरोपीने सुरुवातीला एक महिन्याचे भाडे दिल्यानंतर पुढील भाडे देणे थांबवले. वारंवार मागणी करूनही गाड्या परत न देता, त्या स्वतःकडेच ठेवत आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. वाहनांच्या किमतींसह थकीत भाडे रक्कम धरून एकूण नुकसान १ कोटी १२ लाख ६० हजार रुपये इतके असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे.
भाडेकराराच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक चार महागड्या गाड्या बळकावल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल
|