बातम्या

जिल्ह्यात ‘मोफत सर्व शस्त्रक्रिया अभियान’ उत्साहात

Free All Surgery Campaign in full swing in the district


By Administrator - 3/13/2026 5:32:45 PM
Share This News:



जिल्ह्यात ‘मोफत सर्व शस्त्रक्रिया अभियान’ उत्साहात

रोटरी इंटरनॅशनलचे डायरेक्टर राजू सुब्रमण्यम यांच्याकडून आरोग्य यंत्रणेचे कौतुक

 कोल्हापूर, दि. 13 : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 'मोफत सर्व शस्त्रक्रिया अभियान' राबविण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, कोल्हापूर आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे अभियान 9 मार्च ते 14 मार्च या कालावधीत यशस्वीपणे पार पडत आहे.

या विशेष अभियानांतर्गत आज रोटरी इंटरनॅशनल क्लबचे डायरेक्टर राजू सुब्रमण्यम यांनी सेवा रुग्णालय, कसबा बावडा येथील शस्त्रक्रिया शिबिरास भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून प्रत्यक्ष रुग्णांशी संवाद साधला आणि त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा आढावा घेतला.यावेळी बोलताना श्री. सुब्रमण्यम यांनी कोल्हापूर जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले की, गोरगरीब रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देणे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या अभियानाचे नियोजन केल्याबद्दल त्यांनी त्यांचे विशेष आभार मानले. तसेच, या शिबिरात कार्यरत असलेले सर्व डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य अधिकारी आणि रोटरी क्लबच्या सदस्यांचे त्यांनी अभिनंदन केले. भविष्यातही अशाच प्रकारे सेवा करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, रोटरी क्लबचे राजू प्रधान यांच्यासह रोटरीचे अन्य पदाधिकारी,  डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये आज अखेर जनरल सर्जरी-162, नाक कान घसा -48, बालरोग -35, स्त्री शस्त्रक्रिया -81, प्लास्टिक सर्जरी -3, दंतरोग - 11, अस्थिरोग -23, दंत विकार  -11, नेत्ररोग -660 अशा एकूण 1034 शस्त्रक्रिया करण्यात आल्या.


जिल्ह्यात ‘मोफत सर्व शस्त्रक्रिया अभियान’ उत्साहात
Total Views: 8