बातम्या
अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक- युवतींसाठी मोफत उद्योजकता विकास कार्यक्रम
By nisha patil - 9/9/2025 4:53:36 PM
Share This News:
अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक- युवतींसाठी मोफत उद्योजकता विकास कार्यक्रम
कोल्हापूर, दि. 9 : अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी मोफत उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे पुरस्कृत व जिल्हा उद्योग केंद्राच्या सहकार्याने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.) मार्फत हा एक महिन्यांचा कार्यक्रम 18 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
कार्यक्रमामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थींना उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग संधींची माहिती, उद्योग निवड, बाजारपेठेचे व्यवस्थापन, उद्योग उभारणीचे टप्पे, शासकीय कर्ज योजना, प्रकल्प अहवाल लेखन, हिशेब पद्धती, डिजिटल मार्केटिंग यांसह उद्योगांना प्रत्यक्ष भेटी देण्याची संधी मिळणार आहे.
इच्छुक उमेदवारांसाठी 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता एम.सी.ई.डी. हॉल, द्वारा उद्योग भवन, महावीर गार्डन समोर, कोल्हापूर येथे मोफत उद्योजकता परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार असून निवड समितीमार्फत मुलाखतीनंतर 30 उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
प्रवेशासाठी उमेदवार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील, किमान 8 वी पास, महाराष्ट्राचा किमान 15 वर्षे रहिवासी, वय 18 ते 45 वर्षे व उद्योग करण्याची प्रबळ इच्छा असलेला असावा. निवड झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना संपूर्ण प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी व प्रवेश अर्जासाठी प्रवीण कायंदे, प्रकल्प अधिकारी, एम.सी.ई.डी., उद्योग भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक- युवतींसाठी मोफत उद्योजकता विकास कार्यक्रम
|