बातम्या
शिक्षक ते शिक्षणसंस्थेचे संस्थापक! लक्ष्मण हरणावळांची पुणे पदवीधर निवडणुकीत दमदार एन्ट्री!
By nisha patil - 10/17/2026 4:26:34 PM
Share This News:
शिक्षक ते शिक्षणसंस्थेचे संस्थापक! लक्ष्मण हरणावळांची पुणे पदवीधर निवडणुकीत दमदार एन्ट्री!
प्रतिनिधी अजित बोडके पदवी हातात आहे, पण नोकरी नाही! गुणवत्तेला संधी नाही, तर आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांची स्वप्नं अर्ध्यावरच थांबतात! पदवीधरांच्या याच ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आता पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार लक्ष्मण साहेबराव हरणावळ गुरुजी मैदानात उतरले आहेत.
पदवी केवळ भिंतीवर नको, प्रगती आयुष्यात दिसावी!’ हा प्रभावी संदेश देत त्यांनी पदवीधरांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा, कौशल्यविकासाचा आणि उज्ज्वल भविष्याचा मुद्दा केंद्रस्थानी आणला आहे. केवळ आश्वासनं नव्हे, तर संधी, योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक बळाच्या माध्यमातून तरुणांना स्वावलंबी बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
हरणावळ गुरुजी यांचा प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. २००७ ते २०१५ या काळात त्यांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम केलं. २०११ मध्ये एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीपर्यंत त्यांनी मजल मारली. मात्र, स्वतःच्या प्रगतीसोबतच ग्रामीण विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचा ध्यास घेत त्यांनी २०१६ मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि गोखळी येथे पहिली ते बारावीपर्यंतच्या गुरुकुल विद्यामंदिरची स्थापना केली.
या शैक्षणिक प्रवासातून उल्लेखनीय यश समोर आलं. २०२१ ते २०२६ या काळात संस्थेतील चार बारावीच्या बॅचमधून १२ विद्यार्थी आयआयटी, १४ विद्यार्थी एनआयटी, तर २२ विद्यार्थी एमबीबीएसच्या दिशेने वाटचाल करू शकले. त्यांच्या या कार्याची दखल घेत २०२५ मध्ये एबीपी माझाच्या ‘महाराष्ट्राचे अनमोल रत्न’ पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं. तसेच तत्कालीन तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आदर्श संस्था चालक पुरस्कारानेही त्यांचा सन्मान झाला.
आता शिक्षण क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर पदवीधरांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा त्यांचा निर्धार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी देणारे हरणावळ गुरुजी पदवीधरांच्या आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी कितपत प्रभावी ठरणार, याकडे आता पुणे पदवीधर मतदारसंघाचं लक्ष लागलं आहे.
शिक्षक ते शिक्षणसंस्थेचे संस्थापक! लक्ष्मण हरणावळांची पुणे पदवीधर निवडणुकीत दमदार एन्ट्री!
|