शैक्षणिक
भावी वास्तुविशारदांसाठी सुवर्णसंधी डी वाय पाटीलचा दोन दिवसीय आर्किटेक्चर बूट कॅम्प सुरू
By nisha patil - 6/23/2026 6:22:16 PM
Share This News:
कोल्हापूर, दि. २४ जून : बारावी उत्तीर्ण तसेच वास्तुकलेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे मोफत दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प’ आयोजित करण्यात आला आहे. २४ आणि २५ जून रोजी होणाऱ्या या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वास्तुकला क्षेत्रातील विविध पैलूंचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
‘डिझाइन, डिस्कव्हर, ड्रॉ’ या संकल्पनेवर आधारित या बूट कॅम्पमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण यांचा संगम घडवून विद्यार्थ्यांना वास्तुकलेच्या क्षेत्राची ओळख करून देण्यात येणार आहे.
बूट कॅम्पच्या पहिल्या दिवशी नोंदणी आणि स्वागत समारंभानंतर ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. याशिवाय फेविक्रिल पेंटिंग कार्यशाळा, सर्जनशील उपक्रम आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक पन्हाळा येथे नामवंत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्केचिंग कार्यशाळा आणि फोटोग्राफी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वारसा वास्तूंचे निरीक्षण, रेखाटन आणि दृश्य सादरीकरणाची कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे.
बूट कॅम्पमधील विविध उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके तसेच सहभाग प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वास्तुकलेविषयीची जिज्ञासा, सर्जनशीलता आणि व्यावसायिक दृष्टीकोन विकसित करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वास्तुकला क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्रमुख आर्किटेक्ट इंद्रजीत जाधव यांनी केले आहे.
‘डिझाईन डिस्कव्हर ड्रॉ’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वास्तुकलेचा अनोखा अनुभव
|