बातम्या

गडहिंग्लज तालुका अखेर दुष्काळग्रस्त जाहीर; 

Gadhinglaj taluka finally declared droughthit


By nisha patil - 11/19/2026 8:39:13 PM
Share This News:



गडहिंग्लज तालुका अखेर दुष्काळग्रस्त जाहीर; 

शेतकऱ्यांच्या २० दिवसांच्या आंदोलनाला मोठं यश

​गडहिंग्लज: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनाला आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला अखेर मोठं यश आलं आहे. महाराष्ट्र शासनाने गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त म्हणून अधिकृतपणे जाहीर केला असून, आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील निर्णयावर स्वाक्षरी केल्यानंतर शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला आहे.
​दिलेला शब्द पाळला: लोकप्रतिनिधींची प्रतिक्रियाशासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा दुष्काळी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि समितीच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

 

​त्यांनी सांगितले की, "गडहिंग्लज येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना, दिवाळीनंतर होणाऱ्या उपसमितीच्या बैठकीत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केल्याशिवाय राहणार नाही, असे वचन मी दिले होते. बैठकीत सुरुवातीला दोनच महसूल मंडळांचा प्रस्ताव आल्याने उर्वरित भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी मी लावून धरली होती. मात्र, या दोन कृषी मंडळांच्या अहवालात संपूर्ण गडहिंग्लज तालुक्याचा समावेश असल्याचे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही तांत्रिक बाब तात्काळ महसूल मंत्री बावनकुळे आणि मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आज दुपारी मुख्यमंत्र्यांनी यावर स्वाक्षरी केली आणि अधिकृत आदेश निघाला."​शेतकऱ्यांना मिळणार या महत्त्वाच्या सवलती
दुष्काळग्रस्त तालुका जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या १२ विविध सवलतींचा लाभ मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे:

 

​खरीप पिकांच्या कर्जाचे पुनर्गठन आणि कर्जमाफी संदर्भातील लाभ. ​कृषी पंपांच्या वीज बिलात सवलत.
​दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ.​विशेष आर्थिक मदत: ज्या शेतकऱ्यांचे 'फार्मर आयडी' (Farmer ID) आणि 'ॲग्रीस्टॅक' (AgriStack) नोंदणी पूर्ण आहे, अशा ७/१२ धारक शेतकऱ्यांना थेट ५,००० रुपयांची मदत मिळणार आहे.

 

​या मदतीचा योग्य वापर करून शेतकऱ्यांनी आगामी वर्षभराचे शेतीचे चांगले नियोजन करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.​आंदोलक शेतकऱ्यांच्या संघर्षाचे कौतुकया निर्णयाचे खरे श्रेय हे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे असल्याचे लोकप्रतिनिधींनी आवर्जून नमूद केले. गडहिंग्लज येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सलग २० दिवस सर्वपक्षीय आणि शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. कधी जनावरांचा तर कधी बकऱ्यांचा मोर्चा काढून, तसेच ढोलवादन करून शेतकऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधले होते. शेतकऱ्यांचा हा त्याग, कष्ट आणि आंदोलनामुळेच लोकप्रतिनिधींना शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी बळ मिळाले, अशा शब्दांत त्यांनी सर्व आंदोलक शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत.


गडहिंग्लज तालुका अखेर दुष्काळग्रस्त जाहीर; 
Total Views: 13