बातम्या
आजऱ्यातील खानापूरमध्ये गजराजाने घातलाय धुमाकूळ
By Administrator - 1/14/2026 3:58:58 PM
Share This News:
आजऱ्यातील खानापूरमध्ये गजराजाने घातलाय धुमाकूळ
आजरा(हसन तकीलदार):-आजरा तालुक्यातील खानापूर येथे हत्तीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रात्री अपरात्री येऊन ऊस पिकाचे नुकसान करीत असल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे. वनखात्याचे कर्मचारी येतात रात्री शेकोटी पेटवतात आणि हत्ती हुसकावण्याचा प्रयत्न करतात आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी हत्ती हजर असतो. त्यामुळे वनखात्याच्याही काही अंशी मर्यादा स्पष्ट होताना दिसत आहेत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे वनखात्याने यावर तातडीने उपाययोजना आखून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होताना दिसत आहे.
खानापूर येथील विठोबा आप्पा गुरव, शंकर गुंडू गुरव आणि संजय चव्हाण यांच्या ऊसाचे हत्तीने नुकसान केले आहे.पाच दिवसापूर्वी खानापूर हद्दीतील आजरा साखर कारखाना सेंटर ऑफिस समोरील विजय खटाव यांच्या मारुती गाडीचे आणि त्यांच्या घरासमोरील केळीच्या झाडांचे नुकसान केले आहे. खानापूर, पोळगाव, कासार कांडगाव या गावामध्ये हत्तीने धुमशान घातले असून ऊसतोड टोळ्यासुद्धा भीतीच्या छायेखाली काम करीत आहेत.वर्षभर राबून हातातोंडाला आलेल्या ऊस पिकाचे नुकसान होताना बघत बसण्याशिवाय शेतकऱ्यासमोर उरलेला पर्याय नाही. सातेवाडी, पोळगाव, कासार कांडगाव, खानापूर येथील शेतकऱ्यांनी शेतात पिके घ्यायचीच बंद केली आहेत. खंड नको पण तशीच शेती करा म्हणायची पाळी आली आहे असे सातेवाडीचे प्रगतशील शेतकरी मंगेश पोतनीस आणि रघुनाथ पोतनीस यांनी सांगितले. वन्याप्रण्यांच्या बाबतीत सरकारने आणि वनखात्याने आराखडा आखून ठोस उपाय योजना आखल्याशिवाय शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार नाहीत. अगोदरच खते, औषधे महागली आहेत त्यात मनुष्य बळाची कमतरता आणि त्यावर या वन्य प्रण्यांचा त्रास यामुळे शेतकरी अनंत अडचणीत सापडला आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे रीतसर पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होताना दिसत आहे.
आजऱ्यातील खानापूरमध्ये गजराजाने घातलाय धुमाकूळ
|