बातम्या
पुणे–बंगळुरू महामार्गावर मृत्यूचा खेळ; उलट्या दिशेने आलेल्या कारने दुचाकी उडवली
By nisha patil - 12/22/2025 1:39:13 PM
Share This News:
कोल्हापूर : पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उजळाईवाडी उड्डाणपुलाजवळ उलट्या दिशेने भरधाव आलेल्या अल्पवयीन कारचालकामुळे भीषण अपघात घडला. कागलच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालवणारे गोरक्षनाथ प्रकाश पाटील (वय ३०, रा. गिरगाव, ता. करवीर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेले अभिजित दिनकर खोत (वय ३४, रा. कासारवाडा, ता. राधानगरी) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि. २०) मध्यरात्री सुमारे एकच्या सुमारास घडला.
गोकुळ शिरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोरक्षनाथ पाटील हे मागील एक वर्षापासून उचगाव येथील एका खासगी कंपनीत कार्यरत होते. शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास काम संपवून ते मित्र अभिजित खोत यांच्यासोबत दुचाकीवरून आपल्या गावी परतत होते.
दुचाकी पाटील चालवत असताना उजळाईवाडी उड्डाणपुलाजवळ समोरून उलट्या दिशेने आलेल्या वेगवान कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
पुणे–बंगळुरू महामार्गावर मृत्यूचा खेळ; उलट्या दिशेने आलेल्या कारने दुचाकी उडवली
|