विशेष बातम्या
बनावट स्टिकर वापरून गोवा बनावटीच्या मद्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.
By nisha patil - 5/28/2025 4:50:08 PM
Share This News:
बनावट स्टिकर वापरून गोवा बनावटीच्या मद्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.
गडहिंग्लज परिसरातील गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न
गोवा बनावटीच्या मद्याच्या बाटल्यांना बनावट लेबल्स लावून महाराष्ट्रात विक्री करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या गडहिंग्लज पथकाने पर्दाफाश केला आहे. सांगली जिल्ह्यातील कोणीकर व सोलापूर परिसरात छाप्या दरम्यान माहिती समोर आली आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागात कोल्हापूर विभागाचे उपाधीक्षक युवराज शिंदे यांनी दिली.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, 23 मे रोजी गडहिंग्लज चंदगड रोडवर नेसरी जवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बेकायदेशीर गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या प्रकाश बळीराम चव्हाण रा. कोनीकोनुर व अनिल विकास सोलनकर रा. माडग्याळ जिल्हा सांगली या आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून गोवा बनावटीच्या मद्याचे सोळा बॉक्स व वाहन असा सहा लाख 54 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गडहिंगलज न्यायालयात त्यांना हजर केला असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असताना आरोपी प्रकाश चव्हाण यांच्या कोणीकोनुर तालुका जत येथील हॉटेल जान्हवी मध्ये गोवा बनावटीचा मध्य साठा आढळून आला. या ठिकाणी विविध ब्रँडच्या 32 बाटल्या,बनावट लेबल्स, बाटल्यांच्या टोपणावर लावण्यासाठी युनायटेड स्पिरिट लिमिटेड बारामती फॉर महाराष्ट्र असे लिहिलेले 500 स्टिकर आढळून आले. अधिक चौकशीमध्ये हे स्टिकर सोलापूर इथल्या संजय मुळावकर याच्याकडून घेतल्याचं त्याने सांगितलं तर संजय मुळावकर याने विलास विठ्ठल पोतू याच्याकडून घेतले असे सांगितले. तर गोवा बनावटीचा मद्यसाठा गोवा इथल्या वसंत मलिक यांच्याकडून घेतल्याची माहिती समोर आली.
या कारवाईदरम्यान बनावट लेबल्स लावून मद्यविक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. आत्तापर्यंत सहा लाख 86 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणात आणखीन आरोपीची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
बनावट स्टिकर वापरून गोवा बनावटीच्या मद्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.
|