बातम्या
हुपरीत गांजा तस्कराला अटक; ५ किलो गांजासह ३ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त!
By nisha patil - 11/27/2026 8:43:16 PM
Share This News:
हुपरीत गांजा तस्कराला अटक; ५ किलो गांजासह ३ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त!
कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हुपरीमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. धीरज राजेंद्र पोतदार (वय ३५, रा. वाळवेकरनगर, हुपरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
२६ नोव्हेंबर रोजी हुपरी गावच्या हद्दीतील चव्हाणतळी ते वाळवेकरनगरकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर गांजा विक्रीसाठी एक इसम येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने सापळा रचून धीरज पोतदार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल ५ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत २ लाख ५२ हजार ५०० रुपये आहे. याशिवाय एक मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण ३ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याप्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.
हुपरीत गांजा तस्कराला अटक; ५ किलो गांजासह ३ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त!
|