बातम्या
२४ तास कचरा धुमसतोय; गिजवणेतील गर्जना संघटना आक्रमक!
By nisha patil - 11/24/2026 6:28:03 PM
Share This News:
२४ तास कचरा धुमसतोय; गिजवणेतील गर्जना संघटना आक्रमक!
गिजवणे गावात ग्रामपंचायतीच्या कचरा व्यवस्थापनाचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. घंटागाडीच्या माध्यमातून गावातील गोळा केलेला कचरा थेट संकेश्वर-बांधा रोडलगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळ टाकला जात असल्याचा आरोप गर्जना संघटनेने केला आहे. एवढंच नाही, तर या कचऱ्याला आग लावली जात असल्याने परिसरात विषारी धुराचे लोट पसरत आहेत.
या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, रबर आणि इतर घातक पदार्थांचा समावेश असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, कचऱ्याची आग तब्बल २४ तास धुमसत असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. शाळेतील चिमुकल्यांनी नेमका कोणता गुन्हा केला की त्यांना विषारी धुरात श्वास घ्यावा लागत आहे? असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे.
या प्रकाराविरोधात गर्जना संघटनेने ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देत कचऱ्याची आग तातडीने विझवावी, शाळेजवळ कचरा टाकणे कायमस्वरूपी बंद करावे आणि साचलेल्या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी, अशा मागण्या केल्या आहेत. अन्यथा पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करून कायदेशीर कारवाईचा इशाराही संघटनेने दिला आहे. आता ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर प्रकाराची दखल घेऊन कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
२४ तास कचरा धुमसतोय; गिजवणेतील गर्जना संघटना आक्रमक!
|