बातम्या

भुदरगडमध्ये गॅस टंचाई; शिवसेनेची कडगाव भारत गॅस कार्यालयावर धडक

Gas shortage in Bhudargad


By Administrator - 3/4/2026 5:35:30 PM
Share This News:



भुदरगडमध्ये गॅस टंचाई; शिवसेनेची कडगाव भारत गॅस कार्यालयावर धडक

गॅस वितरणात काळाबाजाराचा आरोप; कारवाई न झाल्यास रस्ता रोकोचा इशारा

सिलेंडरसाठी नागरिकांची धावपळ; शिवसेनेने प्रशासनाला विचारला जाब

भुदरगड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर टंचाईमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना गॅससाठी तासन्तास रांगा लावून उभे राहावे लागत असून, काहींना दिवसन्‌दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर कडगाव येथील भारत गॅस कार्यालयावर आज शिवसेनेने धडक देत कारभाराचा पंचनामा केला.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते दिगंबर गुरव यांनी प्रशासनाला जाब विचारला. वर्षाला एका गॅस कनेक्शनला 12 सिलेंडर मिळण्याचा नियम असताना, अनेक छोट्या कुटुंबांना एक सिलेंडर दोन ते अडीच महिने पुरवावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, काही ठिकाणी एकाच नावावर बुकिंग करून सिलेंडर दुसऱ्यांना दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला.

तसेच भारत गॅस कंपनीमार्फत काळाबाजार होत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. संबंधित गॅस एजन्सीचा परवाना तात्काळ रद्द करावा, अशी मागणी प्रकाश पाटील यांनी दूरध्वनीद्वारे पुरवठा अधिकारी गाडीवड यांच्याकडे केली. जर यावर कारवाई झाली नाही, तर शिवसेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी दिगंबर गुरव यांनी सिलेंडर जादा दराने विक्री होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत, या गैरप्रकाराचा शोध पुरवठा विभागाने घ्यावा, अशी मागणी केली. या आंदोलनात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


भुदरगडमध्ये गॅस टंचाई; शिवसेनेची कडगाव भारत गॅस कार्यालयावर धडक
Total Views: 19