ताज्या बातम्या

छत्रपती ताराराणींचा आदर्श ठेवून रणरागिणी बनण्यास तयार व्हा !

Get ready to become a warrior queen


By nisha patil - 5/12/2025 1:19:26 PM
Share This News:



  कोल्हापूर - सध्याच्या काळात समाजातील असुरक्षितता, गुन्हेगारी प्रवृत्ती, रस्त्यावर होणारी छेडछाड, गुंडांकडून होणारा त्रास, सायबर-छळ इत्यादी घटनांमुळे युवतींच्या सुरक्षेचा प्रश्‍न अत्यंत गंभीर बनलेला आहे. प्रत्येक मुलगी सुरक्षित, आत्मविश्‍वासपूर्ण आणि स्वावलंबी असावी, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

याच उद्देशाने हिंदु जनजागृती समिती, सव्यसाची गुरुकुलम् आणि भागीरथी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबर २०२५ या दिवशी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, खरी कॉर्नरजवळ, कोल्हापूर येथे नि:शुल्क ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचे शिबिर होत आहे. १ हजारपेक्षा अधिक युवतींना यात विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी १०० हून अधिक प्रशिक्षक सहभागी आहेत. या शिबिरात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात कार्यरत नामांकित आणि तज्ञ महिला मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    या पत्रकार परिषदेसाठी ‘सव्यसाची गुरुकुलम्’चे प्रधान आचार्य श्री. लखन जाधव, सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, ‘आंतरराष्ट्रीय आर्यनमॅन’ सौ. माहेश्‍वरी सरनोबत, उद्योजक श्री. नितीन वाडीकर आणि सौ. मनिषा वाडीकर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. महेंद्र अहिरे उपस्थित होते. 

    श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले, ‘‘हे शिबिर  भागिरथी महिला संस्था आणि सव्यसाची गुरुकुलम यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत आहे. केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या एन.सी.आर.बी. (नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या) अहवालानुसार देशभरात गेल्या ३ वर्षांत १० लाख मुली बेपत्ता होऊनही, यातील सर्वांत जास्त मुली महाराष्ट्रातून गायब होत आहेत. त्यामुळे या युवती-महिला यांच्या रक्षणासाठी पुढाकार घेऊन ठोस कृती करणे अपेक्षित आहे. या शिबिरात समाजात घडणार्‍या विविध कठीण प्रसंगांमध्ये युवती-महिलांनी स्वत:चा बचाव कसा करावा, यांविषयीची प्रात्यक्षिके हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करून दाखवली जाणार आहेत. अशा प्रकारचे प्रशिक्षण हे काळाची आवश्यकता असून महाराष्ट्र स्तरावर प्रथमच अशा प्रकारचे विनामूल्य प्रशिक्षण होत आहे. या शिबिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ डिसेंबरला सकाळी १० वाजल्यापासून पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या गडकरी सभागृहात क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शनही लावण्यात येणार आहे. याच समवेत  ८ डिसेंबरला सकाळी ८ सायंकाळी ५ पर्यंत केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन खुले असेल !’’

    श्री. लखन जाधव म्हणाले, ‘‘या शिबिरात आमच्या गुरुकुलातील विशेष प्रशिक्षक महिला-युवती यांना मार्गदर्शन करणार आहेत. या ठिकाणी गुरुकुलम वतीने ऐतिहासिक, दुर्मिळ शिवकालीन शस्रास्रांचे विशेष प्रदर्शन येथे लावण्यात येणार आहे. यात ढाल, तलवार, भाला, जांभिया, कट्यार यासंह अनेक शस्रे पहाण्यास मिळतील. हे प्रदर्शन पाहून आपल्या जाज्वल्य इतिहासाचे स्मरण होण्यास साहाय्य होईल.’’

    सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘शिवप्रतापदिनाचे औचित्य साधून होत असलेल्या या शिबिरासाठी १ सहस्रहून अधिक युवतींची नोंदणी पूर्ण झाली आहे. या शिबिरात युवतींना कराटे आणि लाठीकाठीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नोंदणी झालेल्या युवती-महिला यांना या शिबिरात सहभागी होता येणार आहे. यात सहभागी प्रत्येक युवतीला प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. स्वरक्षणासमवेत आत्मबल कसे वाढवावे याचेही विशेष मार्गदर्शन यात करण्यात येणार आहे.’’

    श्री. शिवानंद स्वामी म्हणाले, ‘‘या कार्यक्रमात ऑलिम्पिक विजेत्या ‘आंतरराष्ट्रीय नेमबाज’ तेजस्विनी सावंत, दोन वेळेस छत्रपती पुरस्कार विजेत्या ‘आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर’ स्नेहांकीता वरुटे, ‘आंतरराष्ट्रीय आर्यनमॅन’ सौ. माहेश्‍वरी सरनोबत, कोल्हापूर येथील पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, सनातन संस्थेच्या संत सद्गुरु स्वाती खाडये, तसेच ‘ए.बी.पी. माझा’च्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. अधिक माहितीसाठी  70207 10460 या क्रमांकावर संपर्क साधावा.’’

 


छत्रपती ताराराणींचा आदर्श ठेवून रणरागिणी बनण्यास तयार व्हा !
Total Views: 24