बातम्या
पाणीटंचाईच्या संकटात घाटगे कुटुंबीयांचा पुढाकार;खाजगी विहिरींचे पाणी नगरपालिकेला देण्याची तयारी
By nisha patil - 6/20/2026 8:38:26 AM
Share This News:
*पाणीटंचाईच्या संकटात घाटगे कुटुंबीयांचा पुढाकार;खाजगी विहिरींचे पाणी नगरपालिकेला देण्याची तयारी*
शेंडूर प्रतिनिधी : अजित बोडके अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात असताना कागलच्या शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आणि पाणी बचतीचे आवाहन केले होते.
त्यांच्या या सामाजिक जाणिवेतून केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांचे काका प्रवीणसिंहराजे घाटगे आणि बंधू वीरेंद्रसिंहराजे घाटगे यांनी कागलमधील त्यांच्या मालकीच्या तीन विहिरींमधील पाणी गरज भासल्यास नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.
याबाबतची माहिती राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्यासह महायुतीचे नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
कागल शहरात पावसाचे आगमन लांबल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन नगरपालिकेने पुर्वकाळजी म्हणून आधीच पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात केली आहे. अशा परिस्थितीत घाटगे कुटुंबीयांनी दाखविलेली सामाजिक बांधिलकी नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. गरज पडल्यास नगरपालिकेमार्फत टँकरच्या साहाय्याने या विहिरींमधील पाणी शहरातील नागरिकांना उपलब्ध करून देता येणार आहे.
घाटगे कुटुंबीयांच्या या लोकहिताच्या निर्णयाबद्दल नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्षा सविता माने यांनी त्यांचे आभार मानले. नागरिकांच्या अडचणीच्या काळात पुढाकार घेऊन मदतीचा हात पुढे केल्याबद्दल त्यांनी घाटगे कुटुंबीयांचे कौतुक केले.
छत्रपती शाहू महाराजांच्या लोककल्याणकारी विचारांचा वारसा जपणाऱ्या घाटगे कुटुंबीयांनी यापूर्वीही समाजहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या खाजगी मालकीचा जयसिंगराव तलाव त्यांनी १९४८ साली कागल नगरपालिकेकडे हस्तांतरित केला होता. त्या ऐतिहासिक निर्णयामुळे आजही हजारो कागलवासीयांची तहान भागत आहे. त्यामुळे पाणीप्रश्नावर पुन्हा एकदा पुढाकार घेत घाटगे कुटुंबीयांनी सामाजिक उत्तरदायित्वाची परंपरा कायम ठेवली असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
यावेळी राजे समरजितसिंह घाटगे यांनी, "आधी केले मग सांगितले" या उक्तीप्रमाणे केवळ आवाहन न करता प्रत्यक्ष कृतीतून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. ज्यांच्याकडे अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध आहे त्यांनीही अशा संकटकाळात प्रशासनाला सहकार्य करून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
घाटगे कुटुंबीयांच्या या निर्णयाचेसर्वत्र स्वागत होत असून सामाजिक बांधिलकीचे हे उदाहरण इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
पाणीटंचाईच्या संकटात घाटगे कुटुंबीयांचा पुढाकार;खाजगी विहिरींचे पाणी नगरपालिकेला देण्याची तयारी
|