बातम्या
बांधकाम कामगारांना दिवाळीला ५ हजारांचा बोनस द्या! शिवसेनेचा सरकारला इशारा
By nisha patil - 4/11/2026 3:06:10 PM
Share This News:
बांधकाम कामगारांना दिवाळीला ५ हजारांचा बोनस द्या! शिवसेनेचा सरकारला इशारा
बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजना गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो बांधकाम कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या सर्व योजना तातडीने सुरू करा आणि नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिवाळीला ५ हजार रुपयांचा बोनस जाहीर करा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
बांधकाम कामगारांच्या नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रियेला मोठा विलंब होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नूतनीकरणासाठी ७ ते ८ महिने, तर नवीन नोंदणीसाठी तब्बल ११ ते १२ महिने लागत आहेत. पूर्वी ही प्रक्रिया दीड महिन्यात पूर्ण होत होती. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच दीड महिन्यात नोंदणी आणि नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी असलेली शिष्यवृत्ती योजना, सुरक्षा संच, गृहपयोगी संच, इंडोशीन किट वाटप आणि गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली आरोग्य सेवा योजना तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मागील वर्षाची प्रलंबित शिष्यवृत्तीही लवकरात लवकर वितरित करावी, असे निवेदनात म्हटले आहे. हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू सांगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास संबंधित कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येतील, असा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
बांधकाम कामगारांना दिवाळीला ५ हजारांचा बोनस द्या! शिवसेनेचा सरकारला इशारा
|