बातम्या

त्या 2700 सभासदांना न्याय द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन उभे करु-उबाठाचे आजरा साखरला निवेदन

Give justice to those 2700 members


By nisha patil - 10/28/2025 5:00:14 PM
Share This News:



त्या 2700 सभासदांना न्याय द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन उभे करु-उबाठाचे आजरा साखरला निवेदन
 

आजरा(हसन तकीलदार):-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आजरा साखर कारखान्याच्या त्या 2700सभासदांना न्याय देण्याबाबत वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याला निवेदन देण्यात आले आहे.
     

 निवेदनात म्हटले आहे की, कारखान्याकडे एकूण 2700सभासद तत्कालीन संचालक मंडळाने मंजूर केले होते. सदर सभासदांनी सन 2016च्या निवडणुकीत मतदानही केले होते परंतु काही संचालकांनी त्यावर तक्रार केली होती त्यामुळे त्यांना मतदार यादीमध्ये समविष्ट न करता त्यांनी भरलेली रक्कम कारखान्याने अनामत रक्कम म्हणून नोंद करून ठेवली आहे. या सर्व सभासदांना कारखान्याने आजपर्यँत सभासद रद्दची कोणतीही नोटीस बजावलेली नाही.त्याचप्रमाणे यामध्ये काही सभासद मागासवर्गीय आहेत. त्यांची सभासद रक्कम शासनाने कारखान्याकडून सभासद प्रमाणपत्र घेऊनच जमा केलेली आहे. या 2700 सभासदांनी भरलेली रक्कम ही कोटीत आहे.

गेली अनेक वर्षे ही रक्कम कारखान्याने फुकट वापरली आहे. परंतु सभासदांना मतदार यादीत समाविष्ट करून घेतलेले नाही की त्यांना कारखान्याकडून आजपर्यँत कोणताही लाभ दिलेला नाही. या सर्व सभासदांवर कारखान्याने एक प्रकारे अन्याय केला आहे. त्यामुळे येणाऱ्या पंधरा दिवसात कारखान्याच्या संचालक मंडळाने या सर्व सभासदांना मतदार यादीत समाविष्ट करावे किंवा या सर्व सभासदांची रक्कम व्याजासहित परत करावी अन्यथा या सर्व सभासदांना घेऊन कारखान्यावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
 

काही सभासदांनी आपली रक्कम व्याजासहित परत करावी किंवा सभासद तरी करून घ्यावे यासाठी अर्जसुद्धा दिलेले आहेत परंतु संचालक मंडळाने यावर कोणताही निर्णय न घेतल्याने या सभासदांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
     

निवेदनावर आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार, शिवाजी आढाव, दिनेश कांबळे, सुयश पाटील, अमित गुरव, बिलाल लतीफ, सखोबा केसरकर, संजयभाई सावंत, हरीशचंद्र व्हरकटे आदींच्या सह्या आहेत.


त्या 2700 सभासदांना न्याय द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन उभे करु-उबाठाचे आजरा साखरला निवेदन
Total Views: 435