बातम्या
महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाची जागतिक दखल
By nisha patil - 8/29/2025 10:22:12 PM
Share This News:
महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाची जागतिक दखल
इंग्लंडच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मान
मुंबई, दि. २९ ऑगस्ट : शून्य विद्युत अपघात जनजागृती अभियानातील विक्रमी लोकसहभागाची नोंद घेऊन इंग्लंडमधील ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्काराने महावितरणचा सन्मान करण्यात आला आहे.
या अभियानाचे मार्गदर्शक व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र तसेच प्रभावी अंमलबजावणीसाठी संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांना आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राने गौरविण्यात आले.
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात *‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’*चे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह महावितरणच्या वतीने संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार आणि विशेष कार्य अधिकारी श्री. मंगेश कोहाट यांनी स्वीकारले. यावेळी प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ. दिवाकर सुकुल (लंडन), शास्त्रज्ञ डॉ. मधू कृष्णन (अमेरिका), ज्येष्ठ संपादक व माजी मंत्री श्री. राजेंद्र दर्डा यांची प्रमुख उपस्थिती होती.
आंतरराष्ट्रीय गौरव
महावितरणच्या लोकाभिमुख विद्युत सुरक्षा अभियानाचे कौतुक पुरस्कार निवड समितीने केले. या समितीत वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्सचे अध्यक्ष श्री. हेनरी आर (युरोप), प्रमुख श्री. पाब्लो (इंग्लंड), उपाध्यक्ष श्री. संजय पंजवानी आणि परीक्षक चंद्रशेखर शिंदे यांचा समावेश होता.
अध्यक्षांचा संदेश
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी या यशाबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, “शून्य विद्युत अपघाताचे उद्दिष्ट हे महावितरणच्या कामाचा दैनंदिन भाग आहे. सातत्याने लोकसंवाद साधत विद्युत सुरक्षेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे.”
विक्रमी लोकसहभाग
महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त १ ते ६ जून दरम्यान राज्यभरात विद्युत सुरक्षेच्या जनजागृतीचे उपक्रम आयोजित करण्यात आले.
-
तब्बल २ लाख ११ हजारांवर नागरिक, शालेय विद्यार्थी, अभियंता, अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष सहभागी झाले.
-
१ कोटी ९२ लाख ७९ हजार ग्राहकांना एसएमएसद्वारे आणि ३५ लाख ७३ हजार ग्राहकांना ईमेलद्वारे विद्युत सुरक्षेचा संदेश देण्यात आला.
या अभियानातील विक्रमी लोकसहभागामुळे महावितरणला यापूर्वी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड कडूनही गौरविण्यात आले आहे. आता या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर *‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’*चा मान मिळाला आहे.
महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाची जागतिक दखल
|