ताज्या बातम्या
‘गोकुळ’चा नवा विक्रम; प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठला”
By nisha patil - 12/1/2026 11:43:25 AM
Share This News:
‘गोकुळ’ दूध संघाने इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक दूध संकलन करत प्रतिदिन २० लाख लिटरचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. सत्तांतरानंतर करण्यात आलेला हा महत्त्वाकांक्षी संकल्प रविवारी प्रत्यक्षात उतरला असून, त्यामुळे ‘गोकुळ’च्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
रविवारी एकूण २० लाख ५ हजार लिटर दूध संकलित झाले. यामध्ये १० लाख ७३ हजार लिटर म्हशीचे आणि ९ लाख ३२ हजार लिटर गायीचे दूध समाविष्ट आहे. दूध उत्पादक शेतकरी, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा उच्चांक गाठण्यात आल्याची माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी दिली.
‘गोकुळ’च्या दुधाला वाढती मागणी लक्षात घेऊन सत्तांतरानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार संघाच्या प्रशासनासह संचालक मंडळाने सातत्याने पाठपुरावा केला.
या मोहिमेला राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विविध कार्यक्रमांतून हसन मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’चे दूध संकलन वीस लाख लिटरवर नेण्यासाठी सातत्याने दिशा दिली, तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले.
यासंदर्भात बोलताना अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले की, प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण होणे हे ‘गोकुळ’च्या सातत्यपूर्ण प्रगतीचे, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृढ विश्वासाचे आणि उत्पादकाभिमुख व पारदर्शक कारभाराचे ठोस प्रतीक आहे. दूध उत्पादकांना अधिक खरेदी दर, अंतिम दूध दर फरक, पशुवैद्यकीय सेवा, गुणवत्तापूर्ण पशुखाद्य, जातिवंत म्हैस खरेदीसाठी अनुदान तसेच विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्यामुळे हे यश शक्य झाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वीस लाख लिटरचा टप्पा पार केल्यानंतर आता पुढील उद्दिष्ट म्हणून २५ लाख लिटर प्रतिदिन दूध संकलन गाठण्याचा मानस असल्याचेही नविद मुश्रीफ यांनी सांगितले.
‘गोकुळ’चा नवा विक्रम; प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठला”
|