राजकीय
गोकुळ निवडणुकीत शक्तीप्रदर्शनाला लगाम '५०० ठराव एकावेळी उर्वरित नंतर' सहकारी विभागाचे सर्व पक्षांना आवाहन
By nisha patil - 6/26/2026 11:17:38 AM
Share This News:
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या २०२६-२०३१ या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी सभासद प्रतिनिधी ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, या प्रक्रियेदरम्यान होणारी गर्दी, गोंधळ आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न टाळण्यासाठी सहकारी विभागाने सर्व राजकीय पक्षांना ठराव टप्प्याटप्प्याने दाखल करण्याचे सार्वजनिक आवाहन केले आहे.
प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (दुग्ध) कृष्णा ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, २५ जून रोजी एका राजकीय पक्षाकडून मोठ्या संख्येने प्रतिनिधींसह एकाच वेळी ठराव दाखल करण्यात आल्याने कार्यालयीन यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला. यावेळी मोठी गर्दी झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि कर्मचारी तसेच प्रतिनिधींमध्ये वादावादीचे प्रसंगही घडल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार २९ आणि ३० जून रोजी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि काँग्रेसकडूनही मोठ्या प्रमाणात ठराव दाखल करण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी संबंधित पक्षांनी एकावेळी केवळ ५०० सभासद प्रतिनिधींचे ठराव दाखल करावेत. त्यानंतर उर्वरित ठराव कार्यालयीन वेळेत टप्प्याटप्प्याने सादर करण्याचे नियोजन करावे, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.
प्रशासनाच्या मते, अशा पद्धतीने ठराव दाखल केल्यास सभासदांची गैरसोय, अनावश्यक गर्दी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आणि शासकीय यंत्रणेवरील ताण मोठ्या प्रमाणात टाळता येईल. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडण्यास मदत होणार आहे.
सहकारी विभागाने स्पष्ट केले आहे की, ही कोणतीही बंधनकारक शासकीय सूचना नसून सर्व संबंधित राजकीय पक्षांना करण्यात आलेले सार्वजनिक आवाहन आणि सहकार्याची विनंती आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
'५०० ठराव आधी उर्वरित नंतर' गोकुळ निवडणुकीत प्रशासनाचा नवा फॉर्म्युला
|