बातम्या
गोकुळ दूध संघाच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करा
By nisha patil - 6/6/2026 6:37:55 PM
Share This News:
गोकुळ दूध संघाच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करा
भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांची प्रशासक मंडळाकडे मागणी
कोल्हापूर, दि. ६ : गोकुळ दूध संघाने दूध विक्री दरात वाढ केल्यानंतरही दूध उत्पादकांना मिळणाऱ्या खरेदी दरात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर गाय व म्हैस दुधाच्या खरेदी दरात किमान प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने गोकुळ दूध संघाच्या प्रशासक मंडळाकडे केली.
भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गोकुळ दूध संघाच्या प्रशासक मंडळाची सदिच्छा भेट घेत विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी प्रशासक मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक, सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परुळेकर तसेच कार्यकारी संचालक गोडबोले उपस्थित होते.
यावेळी शिष्टमंडळाने गोकुळच्या पशुखाद्याच्या दर्जाबाबत येणाऱ्या तक्रारी, बल्क कुलर व्यवस्थेतील अडचणी, जप्त व दुय्यम प्रतीच्या दुधाबाबत उत्पादकांना न्याय मिळावा यासाठी योग्य निर्णय घेण्याची मागणी केली. तसेच ताळेबंदातील ‘वरकड खर्च’ या प्रकारामुळे सर्वसामान्य दूध उत्पादकांना अपेक्षित आर्थिक लाभ मिळत नसल्याने हा खर्च कमी करून त्याचा लाभ थेट दूध उत्पादकांना देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली.
प्रशासक मंडळाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासक मंडळाने कार्यभार स्वीकारल्यानंतर गेल्या महिन्यात दूध विक्री दरात लक्षणीय वाढ केली आहे. परंतु परंपरेनुसार दूध विक्री दर वाढल्यानंतर दूध उत्पादकांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या दरातही वाढ होणे अपेक्षित असते. मात्र अद्याप खरेदी दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
सध्या पेट्रोल-डिझेल, पशुखाद्य, वैरण तसेच अन्य उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे दूध व्यवसाय करणे अधिक खर्चिक झाले आहे. अशा परिस्थितीत दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी गाय व म्हैस दुधाच्या खरेदी दरात किमान प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी युवक नेते अलकेश कांदळकर, भुदरगड तालुकाध्यक्ष भगवान शिंदे, संतोष पाटील, वसंतराव प्रभावळे, मोहन सूर्यवंशी, सुनील तेली, अमोल पाटील, पांडुरंग वायदंडे, संजय भोसले, जिल्हा सरचिटणीस महेश चौगुले, करवीर तालुकाध्यक्ष सतीश पाटील, कागल तालुकाध्यक्ष एकनाथ पाटील, पोपुचंद पवार, परशुराम महाडिक, युवराज जाधव, नेताजी झांबरे पाटील, निवास देसाई, ऋषिकेश पाटील, प्रवीण पाटील, किरण काशीद यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोकुळ दूध संघाच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करा
|