बातम्या
Gokul....‘गोकुळ’च्या वासरू संगोपनातून दुग्ध व्यवसायास नवे बळ – नविद मुश्रीफ
By nisha patil - 7/7/2025 10:38:26 PM
Share This News:
‘गोकुळ’च्या वासरू संगोपनातून दुग्ध व्यवसायास नवे बळ – नविद मुश्रीफ
कोल्हापूर, ता. ०७ :दुग्ध व्यवसायाचा पाया भक्कम करण्यासाठी प्रगत गोठा व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि स्थानिक पातळीवरच पशुधनाची गुणवत्ता वाढवणे या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. “प्रगत गोठा, समृद्ध गोकुळ” या संकल्पनेअंतर्गत गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सुरूपली (ता. कागल) येथील प्रगतशील दूध उत्पादक शहाजी पांडुरंग पाटील यांच्या गोठ्याला भेट दिली.
या भेटीवेळी बोलताना नविद मुश्रीफ म्हणाले, “दुधाच्या उत्पादनात वाढ साधायची असेल तर आपल्या गोठ्यातच जातिवंत रेड्या-पाड्यांचे संगोपन होणे अत्यावश्यक आहे. बाहेरून जनावरे खरेदी करण्यापेक्षा स्थानिक स्तरावरच दर्जेदार पशुधन निर्माण करणे हे गोकुळचे उद्दिष्ट आहे.”
‘मुक्त गोठा’ या संकल्पनेबाबत त्यांनी माहिती देताना सांगितले की, “जनावरांना मोकळं वातावरण, योग्य आहार, वेळच्यावेळी औषधोपचार, स्वच्छता आणि निगा मिळाली तरच दूध उत्पादनात वाढ होते. त्यामुळे गोकुळ संघामार्फत ‘वासरू संगोपन योजना’ व ‘मुक्त गोठा योजना’ राबवली जात आहे. या योजनांमध्ये अधिकाधिक दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा.”
या गोठा भेटीप्रसंगी बिद्री साखर कारखान्याचे संचालक रंगराव पाटील, विकासराव पाटील, निलेश शिंदे, मयूर आवळेकर, बाळासो लाटकर, पी. जे. पाटील, बी. एस. पाटील, तसेच गोकुळ संघाचे विस्तार अधिकारी राहुल घाटगे व रणजित शिंदे उपस्थित होते.
गोकुळच्या पुढाकारामुळे स्थानिक दूध उत्पादकांना मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळणार आहे. अशा उपक्रमांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय अधिक समृद्ध होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.
Gokul....‘गोकुळ’च्या वासरू संगोपनातून दुग्ध व्यवसायास नवे बळ – नविद मुश्रीफ
|