बातम्या

गोकुळमध्ये पशुपालन विषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा

Gokul pashupaln


By nisha patil - 3/17/2026 9:53:22 PM
Share This News:



गोकुळमध्ये पशुपालन विषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा

कोल्हापूर : दुग्धव्यवसाय अधिक सक्षम व शाश्वत करण्याच्या उद्देशाने गोकुळ दूध संघाच्या वतीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणात वांझपणाच्या समस्या व त्यावरील उपाय, वासरांचे योग्य संगोपन, जनावरांना योग्य वेळेत माजावर आणण्याची कार्यपद्धती, गोठा व्यवस्थापनातील सुधारणा तसेच उष्णतेमुळे जनावरांवर होणाऱ्या ताणाचे व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

याशिवाय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन कसे करावे, त्यांच्या अडचणी ओळखून त्वरित उपाययोजना कशा कराव्यात याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमामुळे गोकुळ संघातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे तांत्रिक ज्ञान अद्ययावत होणार असून त्याचा थेट फायदा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. उत्पादनवाढ, जनावरांचे आरोग्य सुधारणा आणि गोठा व्यवस्थापनातील कार्यक्षमता वाढ यामुळे दुग्धव्यवसाय अधिक सक्षम व फायदेशीर होण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमाअंतर्गत पुढील दोन वर्षांच्या कालावधीत पशुधन व्यवस्थापन, प्रजनन क्षमता सुधारणा, जनावरांचे आरोग्य, खाद्य व चारा व्यवस्थापन तसेच विपणन व धोरणात्मक नियोजन या विषयांवर नेदरलँड्समधील पी.यू.एम. (PUM) संस्थेच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.

यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, गोकुळ संघाने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. मात्र मागील काही वर्षांत पशुपालन क्षेत्रात काही आव्हाने निर्माण झाली होती. विशेषतः जनावरांमध्ये वांझपणाचे प्रमाण वाढणे, दूध उत्पादनात अपेक्षित वाढ न होणे, गोठा व्यवस्थापनातील त्रुटी तसेच उष्णतेमुळे जनावरांच्या आरोग्यावर होणारा ताण या समस्या शेतकऱ्यांसमोर होत्या. त्यामुळे तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. गोकुळच्या पशुवैद्यकीय सेवांची शिस्तबद्धता आणि शेतकऱ्यांशी असलेली बांधिलकी पाहूनच नेदरलँड्समधील पी.यू.एम. संस्थेने गोकुळची निवड केली असून ही गोकुळच्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली दखल असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे तांत्रिक ज्ञान वाढून शेतकऱ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन मिळेल आणि दूध उत्पादन वाढीसोबत पशुधन विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यातही अशा आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून गोकुळ संघ अधिक सक्षम, आधुनिक आणि स्पर्धात्मक करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अरुण डोंगळे, अजित नरके, प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ. प्रकाश साळुंखे, डॉ. दयावर्धन कामत, डॉ. प्रकाश दळवी, डॉ. तानाजी कडवेकर, डॉ. सुभाष गोरे, डॉ. रणजीत चोपडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


गोकुळमध्ये पशुपालन विषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा
Total Views: 7