बातम्या
‘गोकुळ’ची गणेशोत्सवी भेट : दूध दरात १ रुपयांची वाढ
By nisha patil - 8/29/2025 6:09:08 PM
Share This News:
‘गोकुळ’ची गणेशोत्सवी भेट : दूध दरात १ रुपयांची वाढ
संस्था, कर्मचारी व उत्पादकांसाठी गोकुळचे नवे निर्णय
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) तर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक, प्राथमिक दूध संस्था आणि संस्था कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले. संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
👉 १ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणारे गोकुळचे निर्णय:
म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ : म्हैस आणि गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर १ रुपयांनी वाढविण्यात आला आहे. या दरवाढीमुळे गोकुळच्या उत्पादकांना दरमहा साडेचार ते पाच कोटी रुपयांचा जादा लाभ मिळणार आहे.
संस्था इमारत अनुदान वाढ : प्राथमिक दूध संस्थांसाठी मिळणाऱ्या इमारत अनुदानात ८ ते १० हजार रुपयांची वाढ.
संस्था कर्मचारी प्रोत्साहन वाढ : दूध संस्था कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी मिळणाऱ्या प्रोत्साहन दरात प्रतिलिटर ५ पैशांची वाढ; वार्षिक ३ कोटींचा भार गोकुळवर.
मुक्त गोठा योजना सुधारणा : आधी ५ जनावरांची अट असलेल्या योजनेत बदल; आता ४ जनावरे असलेल्या लहान उत्पादकांनाही लाभ.
सध्या गोकुळमार्फत ७,५०० प्राथमिक दूध संस्थांद्वारे दररोज १६ लाख लिटर दूध संकलन केले जाते. “दूध उत्पादकांचे श्रम, संस्था सचिव व कर्मचारी यांचा सहभाग हा गोकुळचा पाया आहे. त्यांना योग्य मोबदला देणे आणि दुग्ध व्यवसाय बळकट करणे हेच आमचे ध्येय आहे,” असे नविद मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
‘गोकुळ’ची गणेशोत्सवी भेट : दूध दरात १ रुपयांची वाढ
|