बातम्या

गोकुळची प्रगती ही दूध उत्पादकांच्या सहकार्यानेच – मंत्री हसन मुश्रीफ

Gokuls progress is only possible


By nisha patil - 8/23/2025 10:49:20 PM
Share This News:



गोकुळची प्रगती ही दूध उत्पादकांच्या सहकार्यानेच – मंत्री हसन मुश्रीफ

गडहिंग्लज, ता. २३ ऑगस्ट : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न गडहिंग्लज तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा शनिवारी सूर्या मंगल कार्यालय, गडहिंग्लज येथे संपन्न झाली. या सभेला महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “गोकुळची प्रगती ही दूध उत्पादकांच्या सहकार्यानेच शक्य झाली आहे. गडहिंग्लज तालुक्यातून गोकुळला मिळणाऱ्या दूध पुरवठ्यात म्हैशीचे दूध ५४ टक्के व गाईचे दूध ४६ टक्के आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. गेल्या चार वर्षांत म्हैशीच्या दुधाला १२ रुपये तर गाईच्या दुधाला ६ रुपये अशी महत्त्वपूर्ण दरवाढ देण्यात आली आहे. गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केला आहे.”

ते पुढे म्हणाले, “गोकुळच्या म्हैशीच्या दुधाला बाजारपेठेत मोठी मागणी असून यामुळे संघाची खरी ओळख तयार झाली आहे. मात्र वाढत्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा आहे. त्यामुळे दूध उत्पादन वाढविणे हे आजच्या काळाचे मोठे आव्हान आहे. सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास गोकुळला देशातील नंबर एक ब्रँड बनविणे शक्य होईल.”

मंत्री मुश्रीफ यांनी जातिवंत म्हैशी खरेदीसाठी ‘लाडका सुपरवायझर योजना’ प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. दोन महिन्यांत जवळपास एक लाख म्हशींची खरेदी करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वासाचे दूध, दुय्यम प्रत दूध आणि पशुखाद्याचा दर्जा यांचे वैज्ञानिक पद्धतीने निराकरण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी बोलताना, “गडहिंग्लज तालुक्यात दुग्ध व्यवसायात युवकांचे प्रमाण समाधानकारक आहे. अजून अधिकाधिक तरुणांनी गोकुळच्या सेवा-सुविधांचा लाभ घेऊन दुग्ध व्यवसायात सहभागी व्हावे,” असे आवाहन केले.

सभेत उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल संघाचे चेअरमन व संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले. तसेच किसान विमा पॉलिसीअंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत जनावरांच्या मालकांना विमा धनादेश देण्यात आले.

यावेळी दूध संस्था प्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन त्यांचे निरसन करण्यात आले.

या प्रसंगी माजी चेअरमन विश्वास पाटील, संचालक अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, रणजितसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांच्यासह तालुक्यातील विविध दूध संस्था प्रतिनिधी, संचालक, उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


गोकुळची प्रगती ही दूध उत्पादकांच्या सहकार्यानेच – मंत्री हसन मुश्रीफ
Total Views: 100