बातम्या

गोल्ड क्लस्टरच्या माध्यमातून कोल्हापुरातील सुवर्ण उद्योगाला मिळेल नवी झळाळी - आमदार अमल महाडिक यांचा विश्वास

Gold industry in Kolhapur will get a new boost through gold cluster


By nisha patil - 4/26/2025 10:02:43 PM
Share This News:



गोल्ड क्लस्टरच्या माध्यमातून कोल्हापुरातील सुवर्ण उद्योगाला मिळेल नवी झळाळी - आमदार अमल महाडिक यांचा विश्वास
 

कोल्हापूर ही सोन्याची मोठी बाजारपेठ म्हणून ख्यातनाम आहे. इथल्या अनेक पेढ्यांमधून पारंपारिक आणि नाविन्यपूर्ण कलाकुसरीचे दागिने घडवले जातात. विशेषतः कोल्हापुरी साज हा दागिना जगप्रसिद्ध आहे. कोल्हापुरातील ही सुवर्ण परंपरा उंचावण्यासाठी गोल्ड क्लस्टरची निर्मिती करण्याची मागणी सराफ व्यावसायिक आणि सुवर्ण कारागिरांमधून होत आहे. हुपरी येथील सिल्वर क्लस्टर प्रमाणे कोल्हापुरात गोल्ड क्लस्टर झाल्यास सुवर्ण कारागीरांना सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. सुवर्ण उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञान शासनाच्या पाठबळाने उपलब्ध झाल्यामुळे दागिन्यांचा दर्जा वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर नवे कारागीर घडण्यासही मदत होईल.

या अनुषंगाने आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा सराफ संघ आणि गोल्ड व्हॅल्युएशन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी गोल्ड क्लस्टरची आवश्यकता अधोरेखित केली. यावेळी बोलताना आमदार महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे गोल्ड क्लस्टर विषयी प्रस्ताव सादर करून शासन स्तरावर पाठपुरावा करून उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत व्यापक बैठक घेतली जाईल तसेच प्रत्यक्ष कृती आराखडा तयार केला जाईल अशी ग्वाही दिली. आमदार चित्राताई वाघ यांनी यापूर्वी गोल्ड क्लस्टर संदर्भात गृहराज्य मंत्र्यांच्या दालनात घेतलेल्या बैठकीचाही आमदार महाडिक यांनी आढावा घेतला.
गृह विभागाकडे असणारे सराफ व्यावसायिक आणि सुवर्ण कारागिरांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा विश्वास महाडिक यांनी दिला.

 

सुवर्ण क्षेत्रात कोल्हापूरचे नाव उंचावण्यासाठी गोल्ड क्लस्टर उभारण्याला प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन आमदार महाडिक यांनी दिले.सुवर्ण कारागीर, घाऊक विक्रेते आणि व्यापारी पेढ्या अशा सर्व घटकांसाठी गोल्ड क्लस्टर वरदान ठरेल. या गोड क्लस्टरमुळे कोल्हापूरच्या सुवर्ण उद्योगाला नवी झळाळी प्राप्त होईल असेही महाडिक यांनी नमूद केले.
याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे सचिव माणिक जैन, संजीव खडके, सतीश पितळे, जितेंद्र राठोड, संजय पाटील यांच्यासह सुवर्ण कारागीर आणि सराफ व्यावसायिक उपस्थित होते.


गोल्ड क्लस्टरच्या माध्यमातून कोल्हापुरातील सुवर्ण उद्योगाला मिळेल नवी झळाळी - आमदार अमल महाडिक यांचा विश्वास
Total Views: 125