शैक्षणिक
अभियंत्यांसाठी वायुदलात सुवर्णसंधी; डी. वाय. पाटीलमध्ये मार्गदर्शन
By nisha patil - 4/15/2026 5:46:54 PM
Share This News:
अभियंत्यांसाठी वायुदलात सुवर्णसंधी; डी. वाय. पाटीलमध्ये मार्गदर्शन
कोल्हापूरातील कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतीय वायुदलात करिअर संधी या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. स्क्वाड्रन लीडर राजन अरोरा, फ्लाइट लेफ्टनंट गुरजित सिंग भूलर, फ्लाइंग ऑफिसर ए. यादव आणि वारंट ऑफिसर देवेश कुमार यांच्या पथकाने विद्यार्थ्यांना वायुदलातील विविध करिअर संधींबाबत सविस्तर माहिती दिली.
अभियंत्यांसाठी वायुदलात तांत्रिक, अतांत्रिक आणि प्रशासकीय पदांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध असून, वर्षातून दोन वेळा भरती प्रक्रिया राबवली जाते. एअर फोर्स अकॅडमी आणि एअर फोर्स टेक्निकल कॉलेज येथे प्रशिक्षण दिले जाते. शॉर्ट सर्व्हिस कमिशन आणि पर्मनंट कमिशनद्वारे देशसेवा करण्याची संधी उपलब्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
भारतीय वायुदलाच्या ‘इंडक्शन पब्लिसिटी एक्झीबीशन व्हेईकल’ (IPEV) या विशेष व्होल्वो व्हॅनद्वारे विद्यार्थ्यांना वायुदलाचे अंतरंग अनुभवायला मिळाले. ए.आर. आणि व्ही.आर. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लढाऊ विमानांची माहिती, आधुनिक गॅझेट्स, गणवेश आणि तंत्रज्ञान सादर करण्यात आले. सिम्युलेटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष विमान चालवण्याचा थरारक अनुभव घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने केले होते. यावेळी 1100 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक व कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, सीडीसीआर (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट) विभागाचे अधिष्ठाता प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मकरंद काईंगडे, तसेच सर्व विभाग प्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील आणि विश्वस्त व प्र-कुलपती ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

देशसेवेचा मार्ग खुला; 1100 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
|