विशेष बातम्या
महिलांविरोधी मजकुरावर सरकारचा दणका, ‘ग्रोक’ प्रकरणी X ला कारणे दाखवा नोटीस
By nisha patil - 3/1/2026 12:59:32 PM
Share This News:
नवी दिल्ली :- महिलांविषयी आक्षेपार्ह व अश्लील मजकूर तयार करून प्रसारित करण्यासाठी ‘ग्रोक’ एआयचा गैरवापर होत असल्याच्या गंभीर आरोपांनंतर केंद्र सरकारने x (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नोटीस बजावली आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही कारवाई केली असून, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट केले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या प्रकरणाबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मंत्रालयाने तातडीने दखल घेतली. नोटीसमध्ये एआय प्रणालीद्वारे महिलांना लक्ष्य करणारा, अपमानकारक आणि अश्लील मजकूर तयार होत असल्याबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
मंत्रालयाने X ला ग्रोकच्या तांत्रिक व प्रशासकीय धोरणांचा सविस्तर आढावा घेण्याचे, सर्व बेकायदा व आक्षेपार्ह मजकूर तात्काळ हटवण्याचे तसेच दोषी वापरकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच, ७२ तासांच्या आत करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नियमांचे पालन न झाल्यास संबंधित प्लॅटफॉर्मविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही मंत्रालयाने दिला आहे.
महिलांविरोधी मजकुरावर सरकारचा दणका, ‘ग्रोक’ प्रकरणी X ला कारणे दाखवा नोटीस
|