बातम्या
पोलीस कुटुंबीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही
By nisha patil - 11/26/2026 3:20:47 PM
Share This News:
पोलीस कुटुंबीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही
पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, भविष्यातही त्यांच्या हिताचे आवश्यक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील तसेच पहलगाम हल्ल्यातील शहीद जवान आणि निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी पोलीस कुटुंबीयांसाठी संघटनेने उपलब्ध करून दिलेल्या सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पणही करण्यात आले.
२६/११ चा दहशतवादी हल्ला हा केवळ मुंबईवर नव्हे, तर भारताच्या सार्वभौमत्वावर आणि संविधानावर केलेला हल्ला होता. या हल्ल्यात पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवले. शहीद तुकाराम ओंबळे यांनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता कसाबला जिवंत पकडल्याने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा चेहरा जगासमोर आला, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई तेव्हाही थांबली नाही आणि भविष्यातही थांबणार नाही. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजुटीने उभा असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पोलीस भरती, प्रशिक्षण, पोलीस पाल्यांचे प्रश्न आणि पोलीस कुटुंबीयांचे कल्याण यासंदर्भातील संघटनेच्या मागण्यांवर शासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
पोलीस कुटुंबीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही
|