बातम्या

राज्यपालांच्या हस्ते ‘महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन

Governor releases Maharashtra Lok Bhavan calendar


By nisha patil - 2/1/2026 11:40:15 AM
Share This News:



मुंबई, दि. १ : महाराष्ट्र राजभवनाचे नाव ‘लोकभवन’ करण्यात आल्यानंतर प्रथमच तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र लोकभवन’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते लोकभवन, मुंबई येथे करण्यात आले.

यावेळी दिनदर्शिकेच्या माध्यमातून लोकभवनाचा समृद्ध इतिहास पुढे आणण्यात आल्याबद्दल राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.

या दिनदर्शिकेमध्ये अनेक नामांकित छायाचित्रकारांनी वेळोवेळी टिपलेल्या लोकभवनातील ऐतिहासिक वास्तूंच्या उत्कृष्ट छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई येथील लोकभवनासह नागपूर, पुणे व महाबळेश्वर येथील लोकभवनांच्या वास्तूंची छायाचित्रे तसेच मुंबई लोकभवन परिसरात मुक्त संचार करणाऱ्या राष्ट्रीय पक्षी मोराच्या छायाचित्रांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

नवीन छायाचित्रांसोबतच संबंधित ऐतिहासिक वास्तूंची जुनी छायाचित्रेही दिनदर्शिकेत देण्यात आली असून प्रत्येक छायाचित्राला ऐतिहासिक संदर्भ जोडण्यात आला आहे.

या दिनदर्शिकेत सुधारक ओलवे, नवीन भानुशाली, सचिन वैद्य, प्रतिक चोरगे, हनीफ तडवी, संदीप यादव, वैभव नाडगावकर, रमण कुलकर्णी, नागोराव रोडेवाड, आकाश मनसुखानी, सतीश कुलकर्णी व चंद्रकांत खंडागळे यांच्या छायाचित्रांचा समावेश आहे.

कार्यक्रमास राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव राममूर्ती व जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर उपस्थित होते.

 


राज्यपालांच्या हस्ते ‘महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन
Total Views: 17