बातम्या
संबंधित ग्रामसेवक आणि प्रशासक यांची चौकशी करा -बहुजन मुक्ती पार्टीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन*
By nisha patil - 6/29/2026 7:29:10 PM
Share This News:
**संबंधित ग्रामसेवक आणि प्रशासक यांची चौकशी करा -बहुजन मुक्ती पार्टीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन**
**आजरा(हसन तकीलदार)*:-मौजे देवर्ड येथील अनुसूचित जातीच्या समाज मंदिराचे वीज बिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित असल्याने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अंधारात साजरी करावी लागली. समाज मंदिराचे वीज बिल ग्रामपंचायत भरते.सदर लाईट बिल मागील तीन महिने संबंधित ग्रामसेवक यांनी न भरलेमुळे समाज मंदिराची वीज जोडणी खंडित करण्यात आली होती. त्यामुळे संबंधित ग्रामसेवक आणि प्रशासक यांची चौकशी व्हावी यासाठी बहुजन मुक्ती पार्टीने गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की,मौजे देवर्डे, ता. आजरा, जि. कोल्हापूर अनुसूचित जातीच्या समाजासाठी बांधण्यात आलेल्या समाज मंदिराचे वीज बिल नेहमीच ग्रामपंचायत भरत आलेली आहे.सदर समाज मंदिर हे ग्रामपंचायतीच्या मालकीचे असल्याने त्याची त्याची देखरेख करण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतच करते.
महावितरणच्या नोंदीनुसार ग्राहक क्रमांक 255440333221 असलेल्या समाज मंदिराचे ₹1230 /- इतके वीज बिल थकीत होते.शेवटचा भरणा दि. 10/03/2026 रोजी करण्यात आले होते. त्यानंतर बिल न भरल्यामुळे समाज मंदिराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे अनुसूचित जातीच्या नागरिकांना समाज मंदिराचा वापर करता येत नव्हता ही अत्यंत गंभीर बाब आहे.
यावर्षी दि. 26 जून 2026 रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अनुसूचित जातीच्या समाज मंदिरात साजरी करयात येणार असल्याची माहिती संबंधित ग्रामसेवकांना दूरध्वनीद्वारे पूर्वसूचना म्हणून देण्यात आली होती. तसेच कार्यक्रमासाठी गावाबाहेरून अनेक मान्यवर पाहुणे उपस्थित राहणार असल्याचीही कल्पना त्यांना देण्यात आली होती.ग्रामसेवकांनी आवश्यक ती कोणतीही कार्यवाही न करता वीज बिल भरण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परिणामी मंदिराचा वीजपुरवठा खंडित राहिल्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती अंधारात साजरी करण्याची अत्यंत दुर्दैवी वेळ अनुसूचित जातीच्या समाजावर आली. हा प्रकार संबंधित ग्रामसेवक व प्रशासक यांच्या निष्काळजी, बेजबाबदार आणि कर्तव्यात कसूर करण्याच्या वर्तनाचे द्योतक असून त्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
याबाबत ग्रामसेवकांना अनेक वेळा दूरध्वनीवरून सूचना देण्यात आल्या. मात्र त्यांनी बिल भरण्याऐवजी "कोणीतरी भरून घ्या" तसेच "कोणाच्या तरी घरातून वीज घ्या" असा बेजबाबदार सल्ला दिला. शेवटी ग्रामसेवकांनी सदर बिल दि.26 जून रोजी महत्त्वाच्या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिनी भरलेच नाही. जयंतीचा दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऑनलाईन पद्धतीने हे बिल अदा केले व लाईट सुरु झाली. परंतु सदर बिल हे ऑनलाइन पद्धतीनेच भरायचेच होते तर ते शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी का भरण्यात आले नाही? हेच बिल जर अगोदरच्या रात्री भरले असते तर जयंती अंधारात साजरी करण्याची वेळ आली नसती नसती आणि आम्ही ग्रामसेवकांना हीच विनंती करत होतो की त्यांनी बिल रात्रीच्या वेळी ही ऑनलाईन पद्धतीने भरावे, जेणेकरून लाईट सुरु होईल परंतु त्यांनी तसे केले नाही. "माझ्या अकाउंट वर आता पैसे नाहीत" तुम्हीच हे बिल भरून घ्या किंवा इतर कोणाला भरायला सांगा" असे म्हणणे हे सार्वजनिक पदावरील अधिकाऱ्यास शोभणारे वर्तन नसून कर्तव्यातील कसूर आहे.म्हणून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 नुसार ग्रामपंचायतीवर सार्वजनिक मालमत्तेची देखभाल व आवश्यक सेवा सुरू ठेवण्याची जबाबदारी नुसार,भारतीय राज्यघटनेचे कलम 46 अनुसूचित जातींच्या सामाजिक व शैक्षणिक हितसंबंधांचे संरक्षण व प्रोत्साहन देण्याची राज्याची जबाबदारी निश्चित करते.अनुसूचित जातींसाठी राखीव निधीचा मंजूर उद्देशासाठी वापर न करणे व त्यामुळे समाज मंदिराची सुविधा बंद पडणे हा गंभीर प्रशासकीय निष्काळजीपणा आहे.समाज मंदिराचे थकीत वीज बिल तात्काळ अदा करून वीजपुरवठा खंडित होण्याची वेळ येऊ न देणे संबंधित ग्रामसेवक व प्रशासक यांची जबाबदारी आहे त्यामुळे निष्काळजीपणाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी. दोषी अधिकाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. अनुसूचित जातीसाठी राखीव 15% निधीचा योग्य वापर होत आहे का?याची विशेष चौकशी करण्यात यावी. या प्रकरणात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल बहुजन मुक्ती पार्टीला देण्यात यावा.
अन्यथा, बहुजन मुक्ती पार्टीला संविधानिक व कायदेशीर मार्गाने तीव्र लोकशाही आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. असे या निवेदनात म्हटले आहे.या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर, जिल्हाधिकारी, कोल्हापूर,सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, संबंधित प्रशासक, ग्रामपंचायत देवर्डे यांना देण्यात आल्या आहेत.
**निवेदन दिल्यानंतर लगेच तातडीने गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक व सरपंच यांना बोलावून याबाबत चौकशी केली असता त्यांनी आपली चूक मान्य करून याची भरपाई म्हणून 04 जुलै 2026 रोजी संपूर्ण लोकांच्या उपस्थितीत पुन्हा भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन करून शाहू महाराजांची जयंती कार्यक्रम साजरा करून झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्याचे ग्रामसेवक आणि सरपंच यांनी मान्य केल्याचे समजते.*
यावेळी डॉ. उल्हास त्रिरत्ने, डॉ. सुदाम हरेर, राहुल मोरे,अमित सुळेकर, अवधूत सुतार, राजेंद्र देशमुख, शरद पाटील समीर तकीलदार आदी बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संबंधित ग्रामसेवक आणि प्रशासक यांची चौकशी करा -बहुजन मुक्ती पार्टीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन*
|