बातम्या

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य भिमा कृषी व पशू प्रदर्शन आजपासून; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन

Grand Bhima Agriculture and Livestock Exhibition in Western Maharashtra


By Administrator - 2/13/2026 3:27:48 PM
Share This News:



पश्चिम महाराष्ट्रातील भव्य भिमा कृषी व पशू प्रदर्शन आजपासून; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर / प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे भिमा कृषी व पशू प्रदर्शन यंदा १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कोल्हापूर येथील मेरी वेदर मैदानावर भरविण्यात आले आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले हे प्रदर्शन यंदा १८ व्या वर्षात पदार्पण करत असून शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक तंत्रज्ञान, जनावरे, बी-बियाणे, अवजारे आणि विविध कंपन्यांची उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.

प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज (१३ फेब्रुवारी) सायंकाळी ४ वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

🐂 खास आकर्षणे

यंदाच्या प्रदर्शनात कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटांचा इग्वाना (सरडा) पाहायला मिळणार आहे. तसेच –

  • बैलगाडा शर्यतीतील प्रसिद्ध ‘हरण्या’ बैल

  • १२ लाखांचा खिल्लार खोंड

  • १४०० किलो वजनाचा मुरा रेडा

  • दररोज ३० लिटर दूध देणारी एचएफ गाय

  • अमेरिकन शेळ्या-बोकड

  • जातिवंत खिल्लार गायी व खोंड (सांगोला, दहिवडी)

  • लालकंधारी, देवणी, जर्शी, साहिवाल, गिर गायी (परभणी, नांदेड, लातूर)

  • पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस

  • विविध जातीचे घोडे, मेंढ्या, वराह, कोंबड्या व पक्षी

🏢 नामांकित कंपन्यांचा सहभाग

प्रदर्शनात देश-विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग असून Tata Solar, Karnataka Soaps and Detergents Limited, Chitale Group, राजाराम बापू सहकारी दूध संघ यांसह अनेक कृषी व औद्योगिक कंपन्या सहभागी होत आहेत.

यामुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, सौरऊर्जा प्रकल्प, पंप, बायो प्रॉडक्ट्स, शेती अवजारे आणि विविध उत्पादने थेट खरेदी करता येणार आहेत.

🌾 तांदूळ महोत्सव व कृषी मार्गदर्शन

प्रदर्शनात तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला असून आजरा घनसाळ, रत्नागिरी चोवीस, भोगावती, इंद्रायणी आदी तांदूळ जाती, तसेच बाजरी, नाचणी, सेंद्रिय गूळ, हळद विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

कृषी तज्ञांची व्याख्याने दररोज दुपारी १२ ते ४ या वेळेत होणार आहेत. मृदा सुधारणा, आंबा लागवड, सेंद्रिय शेती, दुधाळ जनावरांचे संगोपन, भाजीपाला लागवड तंत्रज्ञान आणि शासनाच्या योजनांविषयी मार्गदर्शन दिले जाणार आहे.

🏆 पुरस्कार वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम

प्रदर्शनात शेतीभूषण (५), शेतीनिष्ठ शेतकरी (१०), जिजामाता (५), युवा शेतकरी (५), आदर्श शेतकरी (५) आणि शेती तंत्रज्ञ (५) असे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

दररोज सायंकाळी ६ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कराओके गायन, ‘गंध महाराष्ट्राचा’, ‘नृत्य मल्हार’ आणि ‘खेळ पैठणीचा’ असे कार्यक्रम रंगणार आहेत. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सांगता समारंभ व पुरस्कार वितरण होणार आहे.

👩‍🌾 महिला बचत गटांना संधी

भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून २०० हून अधिक महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांचे स्टॉल लावले जाणार आहेत. चार दिवस शेतकऱ्यांना मोफत झुणका-भाकरी देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.


पश्चिम महाराष्ट्रातील भव्य भिमा कृषी व पशू प्रदर्शन आजपासून; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन
Total Views: 18