बातम्या
*रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे हिरक महोत्सवाचा भव्य व दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न
By nisha patil - 9/10/2026 7:43:45 PM
Share This News:
*रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे हिरक महोत्सवाचा भव्य व दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न
*आजरा(हसन तकीलदार):- रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथील ऐतिहासिक रेव्ह. फादर जेकब कार्वाल्हो,एस.जे. मेमोरियल स्टेज व परिसर नुकताच दिव्यांच्या लखलखाटाने, अमाप उत्साहाने आणि जुन्या आठवणींच्या उजाळ्याने उजळून निघाला होता. निमित्त होते शाळेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या (१९६७-२०२७) अतिशय दिमाखदार व भव्य उद्घाटन सोहळ्याचे!
या ऐतिहासिक समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बिशप एमेरिटस अतिमहामहीम ऑलविन बॅरेटो उपस्थित होते. तसेच सिंधुदुर्ग धर्मप्रांतातील इतर रेव्हरंड फादर्स, सिस्टर्स, शाळा व्यवस्थापक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळा सुधारणा समितीचे सदस्य, पालक, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी या सोहळ्याचे साक्षीदार बनले होते.
कार्यक्रमाची मनोहर आणि नयनरम्य सुरुवात सना तकीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अप्रतिम कथक स्वागत नृत्याने झाली. त्यानंतर उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात प्रमुख पाहुणे बिशप ऑलविन बॅरेटो व इतर मान्यवरांच्या हस्ते हिरकमहोत्सवी वर्षाच्या आकर्षक ‘लोगो’चे (Logo) अधिकृत अनावरण करण्यात आले.
आपल्या आशिर्वचनात बिशप एमेरिटस ऑलविन बॅरेटो म्हणाले, "रोझरी शाळेने स्थापनेपासून आजतागायत अत्यंत उत्तम, दर्जेदार शिक्षण आणि चांगले संस्कार दिले आहेत. या शाळेचे खरे वैभव असलेली माजी विद्यार्थी संघटना, कार्यरत शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या अविरत सहकार्यातून व प्रेमातून या संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो." त्यांनी शाळेच्या या निस्वार्थ शैक्षणिक कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.
यानंतर फादर रिचर्ड सालदाना यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडत व्यवस्थापन, आजी-माजी विद्यार्थी व पालकांनी शाळेविषयी हीच आपुलकी आणि कृतज्ञता कायम बाळगून शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमी तत्पर राहावे, अशी इच्छा व्यक्त केली. तसेच 'आरसा' (AARSA) चे अध्यक्ष डॉ. रोझारियो डिसोझा आणि प्रकाश कार्व्हालो यांनीही आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा देत शुभेच्छा दिल्या.
या मंगलसंध्येचे मुख्य आकर्षण ठरले ते रोझरीच्या लाडक्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले विशेष हिरक महोत्सवी नाटक "६० वर्षांचा कालप्रवास". जेसिका कुटीन्हो व सौ. संयोगिता वाळके यांच्या दिग्दर्शनाखाली सादर झालेल्या या नाटकाने उपस्थितांना थेट १९६७ ते २०२६ या साठ वर्षांच्या नयनरम्य आठवणींच्या प्रवासात नेऊन सोडले. यासोबतच स्टीफन फर्नांडिस व जीतन यांनी एलसीडी (LCD) स्क्रीनवर तयार केलेले जुन्या आठवणींचे संगीतमय पॉवर पॉइंट सादरीकरण अत्यंत भावुक, विलक्षण आणि अविस्मरणीय ठरले.
संपूर्ण सोहळ्यात माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. आपल्या लाडक्या आणि आवडत्या शाळेच्या या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान ओसंडून वाहत होते.
शाळा व्यवस्थापक फादर मेल्विन पायस व संयोजक स्टीफन डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांच्या अखंड सहकार्यातून हा सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.प्रास्ताविक व परिचरामध्ये मुख्याध्यापक मनवेल बार्देसकर यांनी शाळेचा ऐतिहासिक परिचय करून दिला.पर्यवेक्षक विजय केसरकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देत स्वागत केले.आशिष फर्नांडिस यांनी आगामी २०२७ च्या विशेष कॅलेंडरचा उद्देश व महत्त्व उपस्थितांसमोर स्पष्ट केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ. सांचेझ डिसोझा व सौ. शैलजा कांबळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संयोजक स्टीफन डिसोझा यांनी मानले.
*रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे हिरक महोत्सवाचा भव्य व दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न
|