बातम्या
कोल्हापूरात १४-१५ मार्चला कंदमुळांचे भव्य प्रदर्शन; २५० हून अधिक प्रकार पाहण्याची संधी
By Administrator - 12/3/2026 1:57:50 PM
Share This News:
कोल्हापूरात १४-१५ मार्चला कंदमुळांचे भव्य प्रदर्शन; २५० हून अधिक प्रकार पाहण्याची संधी
कोल्हापूर : निसर्गात आढळणाऱ्या विविध कंदमुळांची ओळख सर्वसामान्य नागरिकांना व्हावी आणि शेतकऱ्यांनी त्यांची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने कोल्हापूरात १४ व १५ मार्च २०२६ रोजी कंदमुळांचे भव्य व माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात सुमारे २५० हून अधिक प्रकारची कंदमुळे प्रदर्शित केली जाणार आहेत.
हे प्रदर्शन दसरा चौक येथील शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार असून सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. “निसर्गअंकुर” संस्थेच्या मार्गदर्शनाखाली “कोल्हापूर वुई केअर” आणि “एनजीओ कम्पॅशन २४” यांच्या आयोजनातून तसेच विविध संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी १४ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूरच्या महापौर सौ. रुपाराणी निकम, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, शाहू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे आणि सिद्धगिरी नर्सरीचे सतीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती वुई केअरचे प्रमुख मिलिंद धोंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रदर्शनात शतावरी, अमरकंद, सफेद मुसळी, भुईकोहळा, सुरण, अळू, कमळकाकडी, शेवळा, तसेच विविध प्रकारचे अळू, हळदीचे प्रकार, हवाई बटाटे, चिनी बटाटे यांसारख्या देशी-विदेशी कंदमुळांची माहिती आणि प्रत्यक्ष नमुने पाहायला मिळणार आहेत. अनेक कंदमुळांचा औषधी तसेच आहारातील उपयोग कसा होतो याची माहितीही तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे.
प्रदर्शनात कंदमुळांपासून बनविले जाणारे विविध खाद्यपदार्थ, त्यांच्या पाककृती तसेच चाखण्यासाठी काही पदार्थ उपलब्ध असतील. याशिवाय काही कंदमुळे आणि रानभाज्या-औषधी वनस्पतींवरील पुस्तकेही विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
विद्यार्थी, शेतकरी आणि सर्व नागरिकांनी या वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या पारंपरिक अन्नसंपदेची ओळख करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रदर्शनास प्रवेश विनामूल्य आहे.
कोल्हापूरात १४-१५ मार्चला कंदमुळांचे भव्य प्रदर्शन; २५० हून अधिक प्रकार पाहण्याची संधी
|