बातम्या

'श्री अनघा दत्तधाम' प्रकल्पाचा वेदमंत्रांच्या जयघोषात भव्य शिलान्यास सोहळा संपन्न

Grand foundation stone laying ceremony


By nisha patil - 10/29/2026 9:55:40 PM
Share This News:



*धर्माच्या आचरणानेच वैयक्तिक आत्मोन्नतीसह राष्ट्रोत्कर्ष शक्य : जगद्गुरू श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी*

'श्री अनघा दत्तधाम' प्रकल्पाचा वेदमंत्रांच्या जयघोषात भव्य शिलान्यास सोहळा संपन्न

*कोल्हापूर : "सनातन धर्मातील तत्त्वांच्या आधारे प्रत्येकाने दैनंदिन जीवनात आचरण ठेवले, तर वैयक्तिक आत्मोन्नतीसह भारत राष्ट्राचा उत्कर्ष होणे नक्कीच शक्य आहे," असे प्रतिपादन दक्षिण आम्नाय श्रीशृंगेरी शारदा महापीठाचे परमपूज्य जगद्गुरू श्री श्री विधुशेखर भारती (सन्निधानम्) महास्वामीजी यांनी केले। भारत देशाला वेद-उपनिषदांमधील गूढ ज्ञानाची अखंड परंपरा लाभली असून प्रत्यक्ष ज्ञानावर अधिष्ठित असलेला सनातन धर्माचा पाया हाच वैयक्तिक आणि राष्ट्रीय उत्कर्षासाठी कारणीभूत आहे, असेही स्वामीजींनी यावेळी स्पष्ट केले। सनातन धर्म अनादी काळापासून चालत आलेला असून तो कोणा एकाचे मत अथवा कल्पना नसून शाश्वत सत्य आहे, तसेच श्रीशृंगेरी शारदा पीठ व करवीर नगरी यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे ऐतिहासिक नातेसंबंध आहेत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली।

जीवबा नाना जाधव पार्क येथे साकारत असलेल्या 'श्रीविद्या शक्तिपात महायोगाश्रम' प्रणित 'श्री अनघा दत्तधाम' या भव्य प्रकल्पाचा शिलान्यास आणि पूजन परमपूज्य स्वामीजींच्या करकमलांनी वेदमंत्रांच्या जयघोषात अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाले। या ठिकाणी साकारत असलेल्या 'श्री अनघादत्त' आणि 'श्री महात्रिपुरसुंदरी श्रीविद्या' उपासना स्थानाला स्वामीजींचे शुभाशीर्वाद लाभले असून, हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाऊन अधिकाधिक भाविकांना याचा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।

समारंभाच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महोपाध्याय श्री. सुहास जोशी यांच्या हस्ते महास्वामीजींचे पाद्यपूजन करण्यात आले। सुवासिनींनी मंगलमय वातावरणात औक्षण करून स्वामीजींचे भावपूर्ण स्वागत केले, तर उपस्थित तरुणांनी स्वामीजींसमोर लाठी-काठीचे प्रात्यक्षिक सादर केले। याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महोपाध्याय श्री. सुहास जोशी यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती विशद करत प्रास्ताविक व स्वागतपर भाषण केले।

या मंगल सोहळ्यास विश्वपंढरी संस्थेचे प. पू. श्री सांगवडेकर महाराज (आनंदनाथ महाराज), खासदार धनंजय महाडिक, भाजपचे महेश जाधव, उपमहापौर अक्षय जरग, नगरसेवक अभिजीत खतकर, रिंकू देसाई, सुनील वाडकर, मिलिंद धोंड यांच्यासह विविध क्षेत्रांतील राजकीय व सामाजिक मान्यवर, वकील, हिंदुत्ववादी कार्यकर्ते, संस्थेचे सर्व विश्वस्त आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन ओंकार नवलीहाळकर यांनी केले. सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळ व साधकांनी विशेष परिश्रम घेतले।


'श्री अनघा दत्तधाम' प्रकल्पाचा वेदमंत्रांच्या जयघोषात भव्य शिलान्यास सोहळा संपन्न
Total Views: 103