बातम्या
जयसिंगराव तलाव गाळकाढी कामासाठी १६ लाखांचे अनुदान वाटप
By nisha patil - 9/7/2025 5:44:46 PM
Share This News:
कागल :कागल येथील ऐतिहासिक श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलावातील गाळ काढण्याच्या कामात सहभाग घेतलेल्या जेसीबी वाहनधारकांना व शेतकऱ्यांना तब्बल १६ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते हा धनादेश वितरण सोहळा पार पडला.
हा उपक्रम जलयुक्त शिवार अंतर्गत ‘गाळमुक्त तलाव – गाळयुक्त शिवार’ योजनेद्वारे राबविण्यात आला होता. राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनच्या पुढाकाराने तलावातील तब्बल ८ हजार ट्रॉली गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आला होता. शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान तसेच जेसीबी चालकांना वाटप होणारी रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावर घाटगे यांनी पाठपुरावा करून मंजूर करून घेतली.
दोन वर्षांपूर्वी या तलावात गाळ साचल्याने पाणीटंचाई निर्माण झाली होती. या संकटावर उपाय म्हणून घाटगे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यात सर्वप्रथम या पद्धतीने गाळ उपसण्याचे काम झाले. त्यामुळे पाणीसाठवण क्षमतेत वाढ झाली आणि शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सुपीकतेतही लक्षणीय वाढ झाली.
या यशस्वी उपक्रमामुळे स्थानिक शेतकरी, वाहनधारक आणि नागरिकांनी घाटगे यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी राजे बँकेचे संचालक अरुण गुरव, सुशांत कालेकर, माजी संचालक राजेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
जयसिंगराव तलाव गाळकाढी कामासाठी १६ लाखांचे अनुदान वाटप
|