शैक्षणिक
प्राचार्य डॉ.इस्माईल पठाण शहाजी महाविद्यालयात प्रभाकरपंत कोरगांवकर व्याख्यानमाला संपन्न
By nisha patil - 9/17/2025 3:08:10 PM
Share This News:
कोल्हापूर:- महाराष्ट्राच्या समाज जीवन व समाज परिवर्तनात संतांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक, संशोधक प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण यांनी केले.शिवाजी विद्यापीठ आणि श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहाजी महाविद्यालयातील विठ्ठल रामजी शिंदे सभागृहात प्रभाकरपंत कोरगांवकर व्याख्यानमाले अंतर्गत महाराष्ट्राचे समाजजीवन व परिवर्तन या विषयावर प्राचार्य डॉ.इस्माईल पठाण यांचे व्याख्यान झाले. या प्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्रीमती पल्लवी कोरगांवकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रभाकरपंत कोरगांवकर हे दानशूर व्यक्तिमत्व होते. समाज परिवर्तनाचे ते मोठे माध्यम होते असे सूर यावेळी मान्यवरांनी काढले.
प्रारंभी मराठी विभागाच्या वतीने समाज परिवर्तन या भिंतीपत्रकाचे तसेच शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या वरील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.इस्माईल पठाण यांनी महाराष्ट्राच्या समाज जडणघडणीची आणि त्यातील समाज परिवर्तनाचे विविध टप्पे उदाहरणासह विशद केले. त्यांनी पहिल्या शतकापासून महाराष्ट्राच्या समाज जीवनाची जडणघडण झाल्याचे सांगितले. सातव्या शतकातील चिनी प्रवासी व अभ्यासक युवांन श्वांग यांचा दाखला देत ते म्हणाले, मराठ्यांचे आचार विचार हे शहाणपणाचे, भूतदया आणि दातृत्व असणारे आणि सर्वांशी प्रेमाने वागणारे असे होते.
या समाज जीवनात बारा बोलुतेदार ,18 अलुतेदार आणि शेतकरी यांनी खेडी स्वयंपूर्ण केली होती. या समाज जीवनाला स्थिर ठेवण्याचे आणि लोकांचे जीवन निराशेतून आशावादाकडे नेणारे विचार संतांनी मांडले. अंधश्रद्धा,जातिवाद यांना मूठ माती देत त्यांनी विचाराचे प्रबोधन हे भजन कीर्तन प्रवचन यातून केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्रित करून स्वराज्याचा विचार समाजामध्ये पेरला.
पेशव्यांच्या काळापासून पुढे अंधश्रद्धा, अस्पृश्यता ,जातीभेद वाढत गेला. पुढे इंग्रज पोर्तुगीज डज फ्रेंच यांनी व्यापाराच्या माध्यमातून आर्थिक शोषण केले व सत्ताही काबीज केली. राजा राममोहन राय यांनी सतीची चाल बंद केली. मात्र महाराष्ट्रातील काही कर्मटांनी त्यास विरोध केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून ही समाजसेवकांची व समाज धुरीणांची परंपरा पुढे चालत गेली. गांधीजींनी तर ती अधिक जोमाने चालवली. शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या, कायद्याच्या माध्यमातून अधिक पुढे नेली. सद्य परिस्थितीत स्त्री शिक्षण, नोकरीमध्ये समान काम समान वेतन, अभिव्यक्ती व इतर स्वातंत्र्य आणि मुलींचा जन्म झाल्यानंतर त्यांना वाजत गाजत घरी आणने ही परिवर्तनाची नांदीच आहे. प्रभाकरपंत कोरगावकर हे समाज परिवर्तनाचे मोठे माध्यम आहे.त्यांच्या दातृत्वातून अनेक संस्था व व्यक्ती यांना खूप मोठी मदत झालेली आहे .
प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले ,प्रभाकरपंत कोरगांवकर यांनी महात्मा गांधींचे विचार आपल्या आचरणातून पुढे नेले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे सुचेता कोरेगावकर आणि पल्लवी कोरगावकर याही पुढे चालवत आहेत. त्यांचे आणि समाज सुधारकांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे .अशा विचारातून समाज शहाणा होतो.
पल्लवी कोरगावकर म्हणाल्या, प्रभाकरपंत कोरगावकर यांची राहणी साधी होती पण त्यांचे दातृत्व मोठे होते. दान देताना सुद्धा ते कुणालाही कळू देत नसत .त्यांनी आपल्या वाट्याची सर्व संपत्ती कोरगावकर ट्रस्टच्या माध्यमातून समाजच्या मालकीची केली. हजारो लोकांना, विद्यार्थ्यांना, गरजूंना त्यांची मदत झालेली आहे. त्यांच्या कार्याचा वसा आम्हीही पुढे नेत आहोत. प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेच्या निमित्ताने नव्या पिढीपर्यंत त्यांचे विचार नेण्याचा आमचा हा एक उपक्रम आहे.
या सर्व उपक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे व्हाईस चीफ पेट्रन तथा चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
यावेळी कोरगावकर ट्रस्टचे सेक्रेटरी विजय हिंगे ,आंतरभारती शिक्षण संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी भरत शास्त्री, सेक्रेटरी एम. एस. पाटोळे, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. डी.के.वळवी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पी. के. पाटील यांनी केले. डॉ. रचना माने व डॉ. पी. बी. पाटील यांनी संयोजन केले. डॉ. पल्लवी कोडक यांनी आभार मानले.
महाराष्ट्राच्या समाज जीवन व समाज परिवर्तनात संतांचे मोठे योगदान- प्राचार्य डॉ.इस्माईल पठाण शहाजी महाविद्यालयात प्रभाकरपंत कोरगांवकर व्याख्यानमाला संपन्न
|