बातम्या
आप्पाचीवाडी कुर्ली येथे हालसिद्धनाथांच्या भोंब यात्रेचा जल्लोष!
By nisha patil - 10/27/2026 3:06:18 PM
Share This News:
आप्पाचीवाडी कुर्ली येथे हालसिद्धनाथांच्या भोंब यात्रेचा जल्लोष!
श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या पारंपरिक भोंब यात्रेला सोमवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. ढोलवादनाचा निनाद, पालखी मिरवणूक, पारंपरिक खेळ आणि धार्मिक विधींनी यात्रेला रंगत आली आहे. शुक्रवारपर्यंत चालणाऱ्या या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून हजारो भाविक दाखल झाले आहेत.
सोमवारी सकाळी ९ वाजता घोडी, पालखी, ढोल आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत हालसिद्धनाथांची पालखी आप्पाचीवाडीकडे रवाना झाले. कुर्ली येथून निघालेली पालखी मिरवणूक आप्पाचीवाडीतील मंदिरात पोहोचल्यानंतर वाड्यातील हालसिद्धनाथांची उत्सवमूर्ती आणि पालखी मानकऱ्यांसह खडक मंदिरातील उत्सवस्थळाकडे रवाना झाली. खडक मंदिरात रायबागचे प्रमुख मानकरी रायबाग बागेवाडी मानकऱ्यांच्या उपस्थितीत कर बांधण्यात आला आणि यात्रेच्या विधीवत सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी भव्य ढोलवादनाचा (वालंग) गजर, पोटावर तलवार मारण्याचा खेळ आणि लोखंडी गोळे खेळण्याच्या पारंपरिक कार्यक्रमांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. नाथांच्या या पारंपरिक यात्रेतील धार्मिक विधी आणि प्राचीन परंपरा अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
आज रात्री नाथांचे पारंपरिक कार्यक्रम तसेच ढोल वादन व नाथांची पालखी प्रदक्षिणा होणार आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर वाघापूरच्या भगवान डोणे आणि सिद्धार्थ डोणे यांचे आगमन व मध्यरात्री ब्रम्हवेळेत नाथांची पहिली भाकणूक, गुरुवार, २९ ऑक्टोबर हा यात्रेचा मुख्य दिवस असून, या दिवशी नाथांना नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. गुरूवारी रात्री नाथांची पारंपारिक ढोल वादन आणि पालखी प्रदक्षिणा व ब्रम्हवेळेत नाथांची दूसरी भाकणूक तसेच सबीना सोहळा आणि हत्यार मारून खेळण्यासह विविध पारंपरिक विधी पार पडतील. त्यानंतर शुक्रवारी 8 वाजता घुमट संजीवनी समाज मंदिर परिसरात तिसरी भाकणूक होईल. यात्रेनिमित्त आप्पाचीवाडी परिसरात लहान-मोठ्या वस्तूंची दुकाने सजली असून, परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. श्रद्धा, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या हालसिद्धनाथांच्या भोंब यात्रेचा उत्साह शुक्रवारपर्यंत कायम राहणार आहे.
आप्पाचीवाडी कुर्ली येथे हालसिद्धनाथांच्या भोंब यात्रेचा जल्लोष!
|