आरोग्य

लग्नानंतर अवघ्या अर्ध्या तासात नवरदेवाचा मृत्यू; आनंदाच्या सोहळ्यात क्षणातच पसरली शोककळा

Groom dies just half an hour after wedding


By nisha patil - 11/26/2025 1:47:12 PM
Share This News:



अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे आनंदाच्या लग्नसोहळ्यात क्षणातच शोककळा पसरवणारी हृदयद्रावक घटना घडली. विवाहविधी पार पडून अवघा अर्धा तासही उलटत नाही, तोच नवरदेव अमोल गोड यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते मंडपातच कोसळले.

काही वेळापूर्वी मंगल कार्यालयात सनई-चौघडे, हसण्याचे आवाज, टाळ्यांचा गजर आणि आनंदाचा माहोल असताना, क्षणातच ओरडण्याचा आवाज, धावपळ आणि शोकाचा माहोल निर्माण झाला. नातेवाईकांनी तत्काळ अमोल यांना रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले आणि लग्नाच्या दिवशीच नववधूसह दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

वरुड तालुक्यातील पुसला तलाठी कार्यालयात कोतवाल म्हणून काम करणारे अमोल गोड यांचे 25 नोव्हेंबर रोजी लग्न होते. थाटामाटात स्वागत, हारतुरे, पाहुण्यांचे आशिर्वाद, हशा-टवाळ्या—हे सगळं सुरू असतानाच अघटित घडले. नववधूच्या शेजारी उभे असताना त्यांना डोके हलके झाल्यासारखे वाटले आणि ते अचानक खाली कोसळले. उपस्थित मंडळी घाबरून गेली.

रुग्णालयात नेताच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. काही क्षणापूर्वी ज्याच्यासोबत सप्तपदी घेतल्या, ज्याच्यासोबत आयुष्याचे सुंदर स्वप्न पाहिले, तोच पती लग्नानंतर अवघ्या अर्ध्या तासातच हातातून निसटल्याने नववधू कोसळली. या दुर्दैवी आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.


लग्नानंतर अवघ्या अर्ध्या तासात नवरदेवाचा मृत्यू; आनंदाच्या सोहळ्यात क्षणातच पसरली शोककळा
Total Views: 45