बातम्या
आजऱ्यात गुढी पाडवा सण अत्यंत उत्साहात आणि परंपरेने साजरा
By Administrator - 3/19/2026 3:47:57 PM
Share This News:
आजऱ्यात गुढी पाडवा सण अत्यंत उत्साहात आणि परंपरेने साजरा
आजरा (हसन तकीलदार ):-भल्या पहाटे अभ्यंगस्नान करून सुवासीनींनी घराबाहेर कडुनिंब, आंब्याची पाने आणि फुलांनी सजवलेली गुढी उभारून घरोघरी पुरणपोळी, श्रीखंड आणि बासुंदीसारखे गोड पदार्थ बनावण्यात आले. घरोघरी गुढ्या उभारून, रांगोळ्या काढून आणि कडूनिंबाच्या पानांचा नैवेदय दाखवून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. ज्यामुळे परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी, घर किंवा वाहन बुकिंग करण्यास प्राधान्य दिले गेले. त्यामुळे आजऱ्याच्या बाजारपेठेत तिजोरी, सोफा, भांडी इ. वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. परिसरात सर्वत्र आनंदी वातावरण झाले होते. गुढी पूजनानंतर बाजारपेठ खरेदीसाठी फुलली होती. परिसरात सर्वत्र आनंदी वातावरण दिसत होते. पारंपारिक वेशभूषेत हिंदू बांधव एकमेकांना शुभेच्छा देत होते.
दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. गुढी पडव्यापासून राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी पाडव्यादिवशी मराठी नव वर्षाची सुरवात होते. उंच बांबूच्या काठीला कडुनिंबाची डहाळी, काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा चोळीचा खण गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्याची भांडी बसवले जाते. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो.
तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर लावतात. गुढीला गंध, फुले, अक्षता वाहतात व निरंजन लावून उदबत्ती दाखवतात दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते अशी माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश नार्वेकर यांनी दिली तसेच गुढी पाडव्याच्या, नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.
आजऱ्यात गुढी पाडवा सण अत्यंत उत्साहात आणि परंपरेने साजरा
|