बातम्या
गुरुदत्त शुगर्सकडून ऊस वाहतूकदारांना रिफ्लेक्टर कापड बंधनकारक!
By nisha patil - 11/18/2026 3:00:51 PM
Share This News:
गुरुदत्त शुगर्सकडून ऊस वाहतूकदारांना रिफ्लेक्टर कापड बंधनकारक!
सायंकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत वाहनांच्या मागील बाजूस कापड लावणे आवश्यक; नियम न पाळणाऱ्या वाहनांची नोंद होणार नाही....
दत्तवाड प्रतिनिधी : आचिन हेरवाडे : ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने श्री गुरुदत्त शुगर्स लि., टाकळीवाडी कारखान्याने ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदारांसाठी महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रस्त्यावर अपघात होऊ नयेत, यासाठी आरटीओच्या नियमानुसार रिफ्लेक्टर कापड लावण्याच्या सूचना कारखाना प्रशासनाने दिल्या आहेत.
या परिपत्रकानुसार, ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांच्या मागील बाजूस सायंकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत रिफ्लेक्टर कापड लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रेलरची वाहतूक करताना मागून येणाऱ्या वाहनांना त्याचा अंदाज यावा आणि संभाव्य अपघात टाळता यावेत, हा या सूचनेमागील उद्देश आहे.
कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी यांनी जारी केलेल्या परिपत्रकात बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ पासून ज्या वाहनांना रिफ्लेक्टर कापड लावलेले नसेल, अशा वाहनांची नोंद घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ऊस वाहतूक कंत्राटदारांनी तसेच वाहनमालकांनी या सूचनेची गांभीर्याने दखल घेऊन आपल्या वाहनांना रिफ्लेक्टर कापड लावूनच वाहतूक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऊस वाहतुकीच्या हंगामात रस्त्यांवर ट्रॅक्टर-ट्रेलरची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. विशेषतः रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कारखान्याच्या या सूचनेमुळे वाहनांची सुरक्षितता आणि रस्ते अपघात रोखण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
रस्ते सुरक्षा ही केवळ नियमांची बाब नसून चालक, शेतकरी आणि इतर प्रवाशांच्या जीविताशी निगडित आहे. त्यामुळे सर्व ऊस वाहतूकदारांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
गुरुदत्त शुगर्सकडून ऊस वाहतूकदारांना रिफ्लेक्टर कापड बंधनकारक!
|