बातम्या
हालसिद्धनाथ कारखान्याकडून उसाला प्रतिटन ४,२७० रुपयांपर्यंत दर जाहीर!
By nisha patil - 12/11/2026 10:37:44 PM
Share This News:
हालसिद्धनाथ कारखान्याकडून उसाला प्रतिटन ४,२७० रुपयांपर्यंत दर जाहीर!
अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना दिलासा; पहिली उचल ३,७७० रुपये
निपाणी : प्रतिनिधी आचिन हेरवाडे श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना लि., निपाणी यांच्याकडून सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी उसाला प्रतिटन ४,२७० रुपयांपर्यंत दर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कारखान्याचे मार्गदर्शक, माजी खासदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले तसेच निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पहिली उचल प्रतिटन ३,७७० रुपये देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत कारखाना प्रशासनाने हा दर जाहीर केला असून, आर्थिक अडचणीच्या काळातही ऊस उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयाबद्दल कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक मंडळाचे शेतकरी वर्गातून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
अशा पद्धतीने मिळणार वाढीव दर कारखान्याने जाहीर केलेल्या दररचनेनुसार प्रतिटन ३,७७० रुपये हा मूळ दर असून, गळीत हंगामाच्या अखेरीस साखर उतारा ११.५० टक्के झाल्यास प्रतिटन १०० रुपये अतिरिक्त मिळणार आहेत. तसेच साखरेच्या बाजारभावानुसार ५० रुपये दर झाल्यास प्रतिटन २०० रुपये, तर ५५ रुपये दर झाल्यास प्रतिटन ४०० रुपये अतिरिक्त देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या निकषांची पूर्तता झाल्यास शेतकऱ्यांना प्रतिटन एकूण ४,२७० रुपये दर मिळू शकणार आहे. त्यामुळे जाहीर केलेल्या अटी व निकषांनुसार शेतकऱ्यांना अंतिम मोबदला मिळणार आहे.
दरम्यान, कारखान्याच्या चेअरमन यांनी अधिकृत सूचनेद्वारे सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याला ऊस पुरवठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या घोषणेमुळे निपाणी परिसरासह वेदगंगा-दूधगंगा ऊस उत्पादक पट्ट्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता कारखान्याने जाहीर केलेल्या दराची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि अतिरिक्त दराच्या अटींची पूर्तता याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हालसिद्धनाथ कारखान्याकडून उसाला प्रतिटन ४,२७० रुपयांपर्यंत दर जाहीर!
|