बातम्या

शिरोळ पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे हसूर ग्रामस्थांवर रात्रभर जागण्याची वेळ!!!! 

Hasur villagers have to stay awake all night


By nisha patil - 11/20/2026 10:24:56 PM
Share This News:



शिरोळ पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे हसूर ग्रामस्थांवर रात्रभर जागण्याची वेळ!!!! 
 

चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच; गावाच्या सुरक्षेसाठी ग्रामस्थच बनले पहारेकरी/
 

तीन प्रभागांत सहा-सहा जणांची पथके; पंधरा दिवसांपासून रात्रीची गस्त, पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह   ????

शिरोळ तालुका प्रतिनिधी : आचिन हेरवाडे : शिरोळ तालुक्यातील हसूर गावात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, चोरट्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरफोड्या, मंदिरातील चोरी, बैल पळविण्याचे प्रयत्न आणि बंद घरांना लक्ष्य करण्याचे प्रकार सातत्याने घडत असतानाही प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. शिरोळ पोलिसांच्या अकार्यक्षम कार्यपद्धतीमुळे अखेर ग्रामस्थांनाच गावाच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरून रात्रीचा पहारा देण्याची वेळ आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून नागरिक दररोज रात्री हातात बॅटरी घेऊन गावात गस्त घालत आहेत.
 

शिरोळ तालुक्यातील हसूर गावात काही दिवसांपूर्वी सहा ते सात जणांच्या चोरट्यांच्या टोळीने एकाच वेळी तीन घरे फोडण्याचा तसेच नव्याने सुरू झालेली पतसंस्था फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही नागरिक जागे झाल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी तेथून पलायन केले. त्यानंतर हे चोरटे कनवाड येथे जाऊन तेथील जैन मंदिरात चोरी करून पसार झाल्याचे वृत्त आहे. या घटनांमुळे हसूरसह परिसरातील नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
 

दरम्यान, काही दिवसांनी पुन्हा हसूर गावात बैल पळवून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, हा प्रयत्नही अयशस्वी ठरला. त्यानंतर चोरट्यांनी पुन्हा हसूर गावातील एका जुन्या घराला लक्ष्य करून घरफोडी केली. यापूर्वी काही महिन्यांपूर्वी गावातील महालक्ष्मी मंदिरातही चोरीची घटना घडली होती. त्यामुळे घरांपासून मंदिरांपर्यंत कोणतीही जागा चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
 

ग्रामस्थांची बैठक; तीन प्रभागांत स्वतंत्र पथके
सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांनी एकत्र येत बैठक घेतली. गावातील नागरिकांच्या मालमत्तेचे आणि घरांचे संरक्षण करण्यासाठी सामूहिक निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हसूर गावातील तीन प्रभागांमध्ये प्रत्येकी सहा व्यक्तींची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. या पथकांच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी गावातील विविध भागांत नियमित गस्त घालण्याचे नियोजन करण्यात आले.
या निर्णयाची अंमलबजावणी करत गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामस्थ रात्री जागून पहारा देत आहेत. नागरिक आपापल्या घरातील झोप बाजूला ठेवून गावाच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरले आहेत. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, अनोळखी व्यक्तींची माहिती घेणे आणि गावातील संवेदनशील ठिकाणी लक्ष ठेवणे अशा पद्धतीने ग्रामस्थांकडून पहारा दिला जात आहे.
एकीकडे ग्रामस्थांची जागरूकता, दुसरीकडे शिरोळ पोलिसांच्या गस्तीचा प्रश्न
गावातील नागरिकांनी एकजुटीने उचललेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, नागरिकांना स्वतःच्या घराच्या सुरक्षेसाठी रात्रभर जागावे लागणे ही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे आणि चोरीच्या घटना रोखणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी असताना ग्रामस्थांनाच पहारेकरी बनण्याची वेळ का आली, असा सवाल उपस्थित होत आहे.
चोरीच्या घटना घडल्यानंतर संशयितांचा शोध घेणे, चोरट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि प्रभावी पोलीस गस्त घालणे अपेक्षित असताना हसूरमधील नागरिकांना स्वतःच रात्रीचा पहारा द्यावा लागत आहे. यामुळे शिरोळ पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
शिरोळ पोलिसांनी हसूरसह कनवाड परिसरातही गस्त वाढवावी
हसूर गावातील चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेऊन शिरोळ पोलिसांनी गावात नियमित रात्रीची गस्त सुरू करावी. संशयित व्यक्ती आणि चोरट्यांच्या टोळ्यांवर लक्ष ठेवावे. याशिवाय हसूर आणि कनवाड परिसरातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करून नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
गावाच्या सुरक्षेसाठी ग्रामस्थांनी एकजुटीने उचललेले पाऊल स्वागतार्ह असले, तरी ही जबाबदारी केवळ नागरिकांच्या माथी पडता कामा नये. पोलिसांनीही तितक्याच गांभीर्याने या परिस्थितीकडे पाहण्याची गरज आहे.
गाव सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनीच रात्रभर जागायचे, तर शिरोळ पोलिसांची गस्त आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा संतप्त सवाल आता हसूर ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.


शिरोळ पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे हसूर ग्रामस्थांवर रात्रभर जागण्याची वेळ!!!! 
Total Views: 74